ठाणेकरांना मिळतोय दिलासा


शहरात दोन दिवसांत नव्या रुग्णांची नोंद नाही

ठाणे : देशात लॉकडाऊन सुरु झाल्यापासून मुंबईसह ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र होते. पण गत दोन दिवसात ठाणे शहरात एकाही कोरोना बाधीत नविन रुग्णाची नोंद झालेली नाही. त्यामुळे ठाणेकरांसाठी ही दिलासा देणारी बाब असली तरी ठाणेकरांनी घरातच थांबावे असे आवाहन करण्यात आले आहे.

सोमवारी कोरोना विषाणूचे दोन रुग्ण वर्तकनगर भागात आढळले होते. त्यामुळे ठाण्यात कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा १२ झाला होता. संसर्ग टाळण्यासाठी लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले होते. शहरात पहिला रुग्ण आढळल्यानंतर तब्बल दोन आठवडय़ांनी रुग्णांच्या संख्येत वाढ होत गेली . कळव्यातील ५ जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर याच भागातील आणखी दोघांना याची लागण झाली होती. यामध्ये पती पत्नीचा समावेश आहे. तर आतार्पयत शहरात १२ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. कोरोनाचा विषाणू तिसऱ्या टप्प्यात आला असल्याने नागरीकांनी घराबाहेर पडू नये आवाहन पालिकेने केले आहे. याच तिसऱ्या टप्प्यात संसर्गातून हा व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरला जातो. त्यामूळेच लॉकडाऊनच्या काळात कारण नसताना कोणीही एकमेकांच्या संपर्कात येऊ नये असे आवाहन वारंवार महापालिकेकडून करण्यात येत आहे. अशा वातावरणात मंगळवार आणि बुधवारी अशा दोन दिवसात एकाही नव्या कोरोना ग्रस्त रु ग्णांची नोंद ठाण्यात झाली नसल्याने ठाणेकरांना दिलासा मिळाला आहे.

आतापर्यंत २१९१ जणांना तपासले

आतापर्यत पालिकेच्या माध्यमातून १एप्रिलपर्यत २१९१ जणांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये ९८२ नागरीक हे परदेशातून आलेले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या १२०९ जणांचा त्यात समावेश आहे. तर आतार्पयत २०५२ जणांना घरीच देखरेखाली ठेवण्यात आले आहे. तर ६२ जणांना कस्तुरबाला पाठविण्यात आले होते. त्यातील ४५ जणांना तपासणी करुन घरी सोडण्यात आले आहे. तर उर्वरीत ९ जणांवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर अन्य तीन रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. तर पालिकेने तयार केलेल्या विलगीकरण कक्षात ७४ संशयीतांना देखरेखाली ठेवण्यात आले आहे.

 611 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.