मुरबाडच्या कातकरी कुटुंबांना ‘स्पंदन’ची मदत

तातडीने २५ हजार जमा

बदलापूर : ‘कोरोना’च्या संकटामुळे सारेच उद्योग-व्यवसाय बंद असून त्याचा फटका हातावर पोट असलेल्या मुरबाड तालुक्यातील मोठ्या संख्येने असणाऱ्या कातकरी समाजाला बसला आहे. त्यांच्या घरातील चुल पेटण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंची तातडीची आवश्यकता आहे. या परिसरातील आदिवासींच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या श्रमिक मुक्ती संघटनेने आता त्यासाठी पुढाकार घेतला आहे. प्रत्येक कातकरी कुटुंबाला मदत मिळावी यासाठी श्रमिक मुक्ती संघटना प्रयत्नशील आहे. श्रमिक मुक्ती संघटनेने दिलेल्याआवाहनाला स्पंदन फाउंडेशनने सक्रिय प्रतिसाद दिला आहे. अंबरनाथमधील अंबर भरारी संस्थेच्या सदस्यांनी स्पंदन फाऊंडेशनच्या माध्यमातून या उपक्रमात सहभागी होण्याच्या निर्णय घेतला. काही तासात संस्थेच्या सभासदांनी सुमारे २५ हजार रूपये संकलीत केले आहेत.
श्रमिक मुक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी दुर्गम भागातील कातकरी वाड्या वस्त्यांवर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या कुटुंबांना मदतीची गरज असल्याचे आढळून आले. या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू पुरविल्या जात आहेत. संघटनेचे हितचिंतक आणि संवेदनशील नागरिकांनी त्यासाठी प्राथमिक स्वरूपाची ५० हजार रूपयांची मदत दिली आहे. त्या पैशातून स्थानिक बाजारपेठेतून धान्य तसेच इतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करून संबंधित कातकरी कुटुंबांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
श्रमिक मुक्ती संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत अंबरनाथमधील अंबर भरारी संस्थेच्या सदस्यांनी स्पंदन फाऊंडेशनच्या माध्यमातून या उपक्रमात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. काही तासात संस्थेच्या सभासदांनी सुमारे २५ हजार रूपये संकलीत केले. ते सर्व पैसे मुरबाडमधील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या दुकानदाराच्या बँक खात्यात जमा केले जाणार असून त्यातून प्रत्येक कुटुंबाला किमान ४०० रूपयांचे जीवनावश्यक सामान श्रमिक मुक्ती संघटनेचे कार्यकर्ते घरपोच देणार आहेत. अंबरनाथमधील ‘गोवर्धन धान्य संकलन’ या योजनेतूनही कातकरी कुटुंबांना धान्य स्वरूपात मदत केली जाईल, अशी माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
ज्या कुणाला कातकरी कुटुंबांना मदत करायची असेल, त्यांनी श्रमिक मुक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 516 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.