खाजगी दवाखाने तात्काळ सुरु करा

प्रकाश बोरसे यांचे वैद्यकीय संघटनांना लेखी निर्देश

बदलापूर : शहरातील सर्व नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांनी आपली प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णालयं, दवाखाने तात्काळ सुरु करावेत असे निर्देश पालिकेचे मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन बदलापूर शाखा व अध्यक्ष बदलापूर मेडिकल असोसिएशन याना दिले आहेत. यासाठी सेवेत असणारा कोणताही कर्मचारी वर्ग अथवा वैद्यकीय वाहने, यंत्रे आदी वाहतुकीस अडचण आल्यास तात्काळ पालिकेशी अथवा पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा त्यांना सहकार्य करण्यात येईल असेही प्रकाश बोरसे यांनी सांगितले आहे.
कोरोना सारख्या महाभयंकर विषाणूच्या संसर्गामुळे देशात २१ दिवस संचार बंदी ची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. या घोषणेनंतर अनेक गोष्टी बंद आहेत. मात्र अत्यावश्यक सेवा असणारे खाजगी डॉक्टरांनी देखील आता आपले दवाखाने बंद करायला सुरुवात केल्याने सर्वसामान्य नागरिकांनी जायचे कुठे असा प्रश्न बदलापूरकरांना पडला होता. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी खाजगी दवाखाने बंद ठेवू नये अशी विनंती केली आहे. मात्र बदलापूरातील बहुतांश डॉक्टरांनी आरोग्य मंत्र्यांची विनंती धुडकावल्याच चित्र बदलापूरात पहावयास मिळत आहे. काही डॉक्टरांनी आपल्या वेळेत बदल केले आहेत. तर काही डॉक्टरांनी अत्यंत आवश्यक असेल तर फोन करा तरच सेवा उपलब्ध होईल अशा आशयाचे बोर्ड लावले होते. त्यामुळे बदलापूरातील सर्वसामान्य इतर आजार असणाऱ्या रुग्णांनी जायचे कुठे असा प्रश्न त्यांना पडला होता.
या तक्रारी वाढल्यामुळे मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी शासकीय आदेशांचे संदर्भ देत तात्काळ या सुविधा सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना रोगाच्या भीतीने अन्य रोगांवर उपचार करणे थांबवले गेल्यास आणखी मोठ्या प्रमाणात अडचणी उदभवू शकतात तसेच वैधकीय मदत हवी असलेली व्यक्ती उपचारापासून वंचित राहुन जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही बोरसे यांनी आपल्या निर्देशात म्हटले आहे.
बदलापूर पालिकेने डॉक्टरांच्या संघटनेची बैठक घेऊन त्यांनी दवाखाने उघडे ठेवावे अशी विनंती केल्याचे मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी सांगितले. आरोग्यमंत्री यांनी विनंती करून देखील कोणी दवाखाने बंद ठेवत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. मात्र बदलापुरात डॉक्टरांनी तातडीने दवाखाने उघडे ठेवावेत अशी सूचनाही प्रकाश बोरसे यांनी केली आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपले दवाखाने आणि रुग्णालये सुरु ठेवावेत अडचण आल्यास शासन त्यांना सर्वतोपरी सहकार्य करेल असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितले आहे.

 399 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.