सर्व दिव्यांगांना मिळणार रेशन आणि किट

एक महिन्याची पेन्शन ऍडव्हान्स देण्याचा सामाजिक न्याय विभागाचा निर्णय

मुंबई : कोरोना विषाणूच्या संकटकाळी राज्यातील दिव्यांग बांधवांना दिलासा देण्यासाठी लॉकडाऊनच्या कालावधीत हालचाल न करू शकणाऱ्या दिव्यांगांना एक महिन्याचे रेशन व आरोग्यविषयक किट घरपोच वाटप करण्यात येणार असून, यामध्ये धान्य, कडधान्य, डाळी, तांदूळ, तेल इत्यादी साहित्यासह सॅनिटायझर, मास्क, रुमाल, साबण, डेटॉल, फिनेल आणि  आरोग्यविषयक साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

हे आरोग्यविषयक साहित्य त्या त्या जिल्ह्याच्या स्थानिक दिव्यांग कल्याण निधीतून पुरविण्यात यावे असेही सूचित करण्यात आले असून राज्य दिव्यांग कल्याण मंडळाच्या आयुक्तांनी याबाबतचे निर्देश सर्व विभागीय आयुक्तांमार्फत राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले  आहेत. इतर दिव्यांग व्यक्तीना हे साहित्य नजीकच्या रेशन दुकानातून उपलब्ध करून देण्यात यावे व दिव्यांग व्यक्ती स्वतः किंवा त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती विना रांग हे साहित्य घेऊ शकणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय ज्या ज्या ठिकाणी ‘कम्युनिटी किचन’ किंवा तत्सम सुविधा सुरू आहेत किंवा प्रस्तावित आहेत त्या ठिकाणी गरजू दिव्यांग व्यक्तींना घरपोच जेवण/नाष्टा डबे पुरविण्यात येणार आहेत. दिव्यांग व्यक्तींना बँका, पतसंस्था किंवा कोणत्याही वित्तीय संस्थांमध्ये विनारांग सुविधा देण्यात याव्यात असे आदेशही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मनोरुग्ण, बेवारस किंवा निराश्रित असलेल्या व्यक्तींची सोय स्थानिकच्या शेलटर होम, आश्रम किंवा बालगृहात करण्यात यावी असेही निर्देश या निर्णयाद्वारे देण्यात आले असून पेन्शन लाभार्थी दिव्यांगांना एक महिन्याची पेन्शन ऍडव्हान्स देण्यात यावी असाही निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.

दरम्यान सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या निर्णयाद्वारे प्रत्येक जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात दिव्यांगांना एक हेल्पलाईन नंबर टोल फ्री स्वरूपात प्राप्त करून द्यावा व त्याबाबत सर्व दिव्यांगांना विविध माध्यमातून माहिती देवून कोणताही संभ्रम निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश बजाविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान या निर्णयासोबतच दिव्यांगांसाठी लॉकडाऊनच्या काळात मदतीसाठी राज्यातील सर्व महत्वाच्या शासकीय कार्यालये, पोलीस अधिकाऱ्यांचे कार्यालय तसेच सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाचे दूरध्वनी क्रमांकांची यादीही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या यादीसाठी खालील लिंकवर क्लिक करा :

https://twitter.com/dhananjay_munde/status/1243224267996585984?s=19Share on:

 618 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.