बदलापूर: ‘कोरोना’मुळे संपूर्ण देशात संचारबंदी असून अत्यावश्यक सेवा मात्र सुरू आहेत. मुंबई परिसरातील सरकारी, महापालिकेची रुग्णालये, महापालिकेचा आपत्कालिन विभाग, स्वच्छता विभागाचे कर्मचारी, पोलीस आपापल्या नेमून दिलेल्या ठिकाणी कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्या वाहतुकीसाठी ‘बेस्ट’ उपक्रमाने मुंबई- ते बदलापूर खास बस सेवा सुरू केली आहे. बेस्टच्या या सेवे बरोबरच महाराष्ट्र राज्य परिवहन ची बदलापू ते ठाणे (खोपट) सेवा सुद्धा नियमित सुरु आहे. मात्र हि सुद्धा अत्यावश्यक सेवा देणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठीच आहे. अद्याप प्रवासी वाहतुकीला परवानगी देण्यात आलेली नाही.
मुंबईतील कस्तुरबा, सायन, राजावाडी, जे.जे., केईएम, क्षयरुग्ण (टी बी.) रुग्णालय आदी रुग्णालये, महापालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणेतील अनेकजण ठाणे जिल्ह्यातील उपनगरांमध्ये राहतात. त्या सर्व अत्यावश्यक सेवकांना संचारबंदीच्या काळात प्रवास करता यावा म्हणून ‘बेस्ट’ने ही खास सेवा सुरू ठेवली आहे. नेमणुकीचे ओळखपत्र दाखवून कर्मचारी या सेवेचा लाभ घेऊ शकतात. बसमध्ये सुरक्षित अंतर ठेवून प्रवासी बसतात. एका सीटवर एकच प्रवासी बसू शकतात. एकही प्रवासी उभ्याने प्रवास करू शकत नाही त्यातही सुरक्षित अंतर राखण्याचा कसोशीने प्रयत्न केला जात आहे. मुंबई, नवी मुंबई, काटई नाका तसेच कल्याण कोन, ठाणे मार्गे ही सेवा सुरू आहे. बदलापूर रेल्वे स्टेशन जवळ पूर्वेकडून जाणारी बस सेवा हि शिळफाटा मार्गे जाते तर पश्चिमेकडून बस स्टॅन्ड वरून सुटणाऱ्या बसेस या उल्हासनगर, कल्याण, कोन, ठाणे मार्गे जात आहेत.
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या वतीने बदलापूर पश्चिमेकडील बस स्टॅन्ड वरून बदलापूर ते ठाणे (खोपट) अशी बस सेवा सुरु आहे. सकाळी साडेपाच ते रात्री आठ या वेळेत सकाळी आणि सायंकाळी दर पंधरा मिनिटांनी आणि दुपारच्या वेळेस दर अर्ध्या तासाने हि बससेवा सुरु आहे. अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हि बससेवा सुरू आहे. प्रवासी वाहतुकीला अद्याप परवानगी देण्यात आली नसल्याचे परिवहन खात्याच्या सूत्रांनी सांगितले.
737 total views, 1 views today