चढ्या भावाने माल विकल्यास दुकानदारांवर कारवाई

नागरिकांच्या परिस्थीतीचा फायदा दुकानदारांनी घेवू नये : महापौर नरेश म्हस्के

ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश हा लॉकडाऊन झाला आहे, नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी जीवनावश्यक सुविधा सुरू राहणार असल्‌याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. मात्र ठाणे शहरातील काही दुकानदार आपल्या जवळील माल अव्वाच्या सव्वा भावाने विकून नागरिकांची फसवणूक करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. असे आढळल्यास नागरिकांनी जवळच्या शिवसेना शाखेशी तसेच आपल्या स्थानिक नगरसेवकांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधावा असे सांगत दुकानदारांनी नागरिकांच्या परिस्थीतीशी खेळू नये असे आवाहन वजा इशारा महापौर नरेश म्हस्के यांनी दिला आहे.

सध्या सर्वत्र बंदीचे वातावरण जरी असले तरी जीवनावश्यक मालाची आवक सुरू आहे. मात्र काही दुकानदार हे मालाची साठेबाजी करीत आहे, नागरिकांना वाजवीपेक्षा दुप्पट तिप्पट दराने आपल्या जवळील माल विकत असल्‌याच्या तक्रारी नागरिकांनी महापौरांकडे केल्या आहेत. त्याची दखल घेत ठाणे शहरातील दुकानदारांनी नागरिकांची फसवणूक करु नये, आहे त्याच किमंतीला आपल्याकडील माल विकावा असे आवाहन त्यांनी दुकानदारांना केले आहे. जर कोणी दुकानदार अशाप्रकारे नागरिकांची फसवूणक करीत असेल तर नागरिकांनी आपल्या नजीकच्या शिवसेना शाखेशी संपर्क साधावा तसेच नगरसेवकांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून संबंधित दुकानदाराची माहिती द्यावी जेणेकरुन अशा दुकानदारांवर पोलीसांमार्फत कारवाई करणे शक्य होईल असेही महापौरांनी नमूद केले आहे.
संपूर्ण देश हा एका भीतीच्या वातावरणातून जात आहे, या परिस्थीतीचा सामना करण्यासाठी केंद्रशासन, राज्यशासन, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आपापल्या पध्दतीने नागरिकांची काळजी घेत आहे, घरी राहण्याचे आवाहन करीत आहे. नागरिकांच्या या परिस्थीतीचा फायदा दुकानदारांनी घेवू नये व आपल्याकडील माल आहे त्याच ‍किंमतीला विकावा असे आवाहन महापौरांनी केले आहे, जर नागरिकांकडून दुकानदारांबाबत शिवसेना शाखेत अथवा स्थानिक नगरसेवकांकडे तक्रारी प्राप्त झाल्या तर नाईलाजाने दुकानदारांवर कारवाई करावी लागेल असा इशाराही महापौर नरेश म्हस्के यांनी दिला आहे.

 597 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.