ठाणे सिटी फुटबॉल क्लबआयोजित चर्चसत्रात पालक – खेळाडूंचा सहभाग
ठाणे : खेळांची संघटना, पदाधिकारी, प्रशिक्षक आणि खेळाडू यांच्या जोडीने खेळाडूंच्या पालकांचा सक्रिय सहभाग हा खेळाच्या विकासासाठी महत्वाचा आहे असं प्रतिपादन जागतिक फुटबॉल महासंघाचे (फिफा) माजी विकास अधिकारी आणि आशिया फुटबाल महासंघाचे वरिष्ठ विकास सल्लागार शाजी प्रभाकरन यांनी केले. त्याचवेळी मुलाच्या खेळातील प्रगतीवर लक्ष ठेवताना पालकांनी स्वतःच एक निदान रेषा आखायला पाहिजे असे स्पष्ट मत आशियाई फुटबॉल महासंघाच्या विकास उपक्रमातील पहिल्या भारतीय अंजू तुरुंबेकर यांनी व्यक्त केले. ठाणे सिटी फुटबॉल क्लब आयोजित खेळांमुळे विशेषतः फुटबॉल खेळल्यामुळे मुलांचा होणारा विकास आणि त्याचे सामाजिक जीवनावर उमटणारे पडसाद यावर चर्चासत्रात पालकांशी संवाद साधताना प्रभाकरन आणि तुरंबेकर बोलत होते.
या चर्चासत्रात बोलताना प्रभाकरन यांनी प्रशिक्षण आणि खेळण्यासाठी खेळाडूंचा अधिकार यावर भाष्य केले. तर तुरंबेकर यांनी महिला खेळाडूच्या सक्षमीकरणावर भर दिला. खेळामध्ये विशेषतः फुटबॉल खेळातला पालकांचा सहभाग हा चांगला असून त्यामुळे खेळांचा विकास व्हायलाच मदत होईल असे प्रभाकरन यांनी सांगितले. तर अशा प्रकारच्या चर्चासत्रामुळे पालक आणि प्रशिक्षक यांचातील संवाद वाढेल त्यातून खेळाचा सुयोग्य पद्धतीने विकास होईल असे अंजू तुरंबेकर म्हणाल्या. ठाणे सिटी फुटबॉल क्लब आयोजित या उपक्रमाची दोघा वक्त्यांनी कौतुक करत खेळ आणि खेळाडूंच्या विकासासाठी असे उपक्रम महत्वाचे असल्याचे सांगितले. ठाण्यातील फुटबॉलपटूना प्रगतिपथावर नेण्यासाठी हे चर्चासत्र पहिले पाऊल होते. ठाण्याला फुटबॉल हब बनवण्यासाठी असे आणखी उपक्रम आयोजित करू असे ठाणे सिटी फुटबॉल क्लबचे प्रशांत सिंग यांनी सांगितले.
746 total views, 1 views today