कचऱ्यातून स्वछता, आरोग्य, रोजगार आणि उत्पन्न

“पृथ्वी” मध्ये अंबरनाथ पालिकेचा समावेश


पालिकेच्या सहयोगातून पथदर्शी प्रयोग :राज्यातील एकमेव पालिका

अंबरनाथ : देशभरात ३० शहरांमध्ये संयुक्त राष्ट्र विकास प्रकल्पांतर्गत स्वच्छतेचा “पृथ्वी” हा विशेष प्रकल्प राबविला जात आहे. महाराष्ट्रामध्ये दोन महापालिका आणि एकमेव अंबरनाथपालिकेचा या पृथ्वी या प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे. या योजनेत कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यातून नियोजनबद्ध पद्धतीने रोजगार निर्मिती, कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावून उत्पादन वाढवणे अर्थात कचऱ्यातून स्वच्छता, आरोग्य, रोजगार आणि उत्पादन घेण्याचा हा प्रकल्प आहे. अंबरनाथ शहरात २ ऑक्टोबर २०१९ पासून या प्रकल्पाला सुरुवात झाली असून एकुण २५ टन कचऱ्याचे वर्गीकरण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सध्या पाच ते सहा टन कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते. त्यासाठी लागणारी यंत्रणा कोका कोला कंपनीने उपलब्ध करून दिली आहे. सध्या प्रकल्पात कार्यरत असणाऱ्या ४५ कचरा संकलक, वेचक महिलांना दररोज सरासरी ४०० रूपये मजुरी दिली जाते. याशिवाय कचरा गोळा करून आणणाऱ्या घंटागाडीवरील कामगार जे प्लॅस्टिक अथवा कचरा आणतात, त्याच्या दर्जानुसार त्यांना पैसे दिले जातात.
महानगरीय जीवनशैलीत अपरिहार्यपणे निर्माण होणाऱ्या वाढत्या कचऱ्याचे व्यवस्थापन हे सर्वच स्थानिक प्रशासनांसमोर मोठे आव्हान ठरले आहे. या कचऱ्याचे व्यवस्थित वर्गीकरण करून त्यातील घटकांचा पुनर्वापर केला तर त्याला मूल्य प्राप्त होऊन ही समस्या आटोक्यात आणता येते, हे अंबरनाथ शहरात संयुक्त राष्ट्र विकास प्रकल्प आणि कोका-कोला कंपनी यांनी संयुक्तरित्या राबविलेल्या “पृथ्वी” या उपक्रमाने दाखवून दिले आहे. या योजनेसाठी पालिकेने पश्चिम विभागात सर्कस मैदान इथे सध्या जागा आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पहिल्या टप्प्यात याठिकाणी कचऱ्याचे वर्गीकरण केले जात असून संबंधित घटक प्रदुषण नियंत्रण मंडळाने परवाना दिलेल्या पुनर्वापर कंपन्यांना विकले जात आहे. या प्रकल्पातून ४५ कचरा वेचकांना दररोज ३५० ते ४०० रूपये रोजगार मिळू लागला आहे. अंबरनाथमध्ये घंटागाड्यांमार्फत संकलीत होणाऱ्या प्लॅस्टिक पैकी ४० ते ४५ टक्के प्लॅस्टिक या प्रकल्पाच्या माध्यमातून पुनर्वापर प्रक्रियेसाठी पाठवले जात आहे.
‘दासजीएस’ या खासगी कंपनीमार्फत या प्रकल्पाचे व्यवस्थापन केले जात आहे. पूर्वीच्या व्यवस्थेत कचराभूमीवर कचरा वेचकांकडून गोळा होणारे प्लॅस्टिक भंगारात विकले जात असे. मात्र त्यात फारशी किंमत न येणाऱ्या वस्तू पडून राहत होत्या, किंवा ओढा नाल्यांमध्ये फेकल्या जात होत्या. या प्रकल्पामुळे कचऱ्याचे वर्गीकरण अधिक शिस्तीने होईल, असा दावा या प्रकल्पाच्या समन्वयिका प्रियांका वाळुंज यांनी व्यक्त केला आहे. कचरा वेचक महिलांना “नारी सफाई साथी” असे म्हटले जाते. त्यांच्या माध्यमातून “पाठशाळा एक्सचेंज” हा सुद्धा वेगळा उपक्रम या अंतर्गत राबविला जात आहे. यामध्ये सर्वसाधारण, सुशिक्षित महिला आणि या “नरी सफाई साथी” यांचे वर्ग भरवले जात असतात. यात या सर्व महिला एकमेकींना आलेले अनुभव आणि आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचे आदान प्रदान करतात.

२५ टन कचऱ्याचे वर्गीकरण होणार

सध्या देशभरात ३० शहरांमध्ये अशा प्रकारचा उपक्रम संयुक्त राष्ट्र विकास प्रकल्पांतर्गत राबविला जात असून त्यातील अंबरनाथ एक आहे. या योजनेत एकुण २५ टन कचऱ्याचे वर्गीकरण केले जाणार असून पहिल्या टप्प्यात सध्या पाच ते सहा टन कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते. त्यासाठी लागणारी यंत्रणा कोका कोला कंपनीने उपलब्ध करून दिली आहे. सध्या प्रकल्पात कार्यरत असणाऱ्या ४५ कचरा संकलक, वेचक महिलांना दररोज सरासरी ४०० रूपये मजुरी दिली जाते. याशिवाय घंटागाडीवरील कामगार जे प्लॅस्टिक अथवा कचरा आणतात, त्याच्या दर्जानुसार त्यांना पैसे दिले जातात.
संकलीत होणाऱ्या कचऱ्यातून जीवनोपयोगी वस्तू बनविण्याची योजना आहे. सध्या या प्रकल्पात वेगळ्या होणाऱ्या प्लॅस्टिकपासून सफाई कर्मचाऱ्यासाठी झाडू बनविल्या जात आहेत. शिवाजी आहेर हे लघु उद्योजक कचऱ्यातील प्लॅस्टिकपासून झाडू बनवितात. आतापर्यंत त्यांनी चार-साडेचार हजार झाडू बनविल्या असून त्या अंबरनाथ, बदलापूर, कल्याण-डोंबिवली येथील सफाई कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. अशाच प्रकारे अन्य जीवनोपयोगी वस्तू बनविण्यात असल्याची माहिती पालिकेचे आरोग्य अधिकारी सुरेश पाटील यांनी दिली.
शहरातील नागरिकांनी आपल्या घरातील प्लास्टिक वेगळे करून दिले तर ते अधिक चांगले होईल. यातून कचरा वेचक महिलांना चांगले उत्पन्न तर मिळेलच त्याचबरोबर स्वच्छता राखण्यात यश मिळेल असा विश्वासही सुरेश पाटील यांनी व्यक्त केला आहे. सर्कस ग्राऊंडवरील प्रकल्प यशस्वी होत आहे. असाच प्रकल्प शहरातील अन्य विभागात लवकरच सुरु करण्यात येईल. स्वच्छ भारत अभियान आपण राबवित आहोत या माध्यमातून स्वच्छतेची कायम स्वरूपी सवय लागणे अपेक्षित असल्याचे मुख्याधिकारी देविदास पवार यांनी सांगितले.

लोकांचा सहभाग वाढवण्याचे आवाहन

शहरातील सामाजिक संघटना गेल्या काही वर्षांपसून दर महिन्याला घरातील टाकाऊ प्लास्टिक जमा करण्याचा उपक्रम यशस्वीपणे राबवित आहेत. त्याला नागरिकांचा प्रतिसाद वाढत आहे. पूर्वी हे प्लास्टिक पुणे नंतर डोंबिवली येथे पाठविले जात होते आता पालिकेच्या या प्रकल्पात हे प्लास्टिक दिले जाते. त्यामुळे शहरातील प्लास्टिकचा कचरा कमी होत असून प्लास्टिकचा कचरा थेट वर्गीकरण करून पुनर्प्रक्रियेसाठी पाठविले जात आहे. या उपक्रमात शहरातील नागरिकांनी आणखी सहभाग वाढवावा असे आवाहन प्रसन्न चौधरी आणि अजित गोडबोले यांनी केले आहे.

 716 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.