अखेर सर्व शाळा, महाविद्यालय, अंगणवाड्या ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची विधानसभेत माहिती

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंध कायदा लागू झाला असून खबरदारीचा उपाय म्हणून सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती या शहरी क्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्या ३१ मार्च पर्यत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकाळात परीक्षा सुरू राहतील. ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये सुरू राहतील. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. दरम्यान, राज्यात कोरोनाचे २६ रुग्ण आढळून आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

यासंदर्भात निवेदन करतांना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने वेळीच हा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंध कायदा लागू असून राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे, तरणतलाव, व्यायामशाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस प्रशासन यांना राज्य शासनाने सूचना निर्गमीत केल्या आहेत.

राज्यातील शहरी भागातील सर्व शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या देखील ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. याकाळात मंडळ परिक्षा सुरू राहतील, असे स्पष्ट करताना परिक्षांच्या काळात आजारी विद्यार्थी शाळांमध्ये येणार नाहीत याची खबरदारी पालक आणि शाळांनी घ्यायची आहे.

राज्यात पुढील आदेश होईपर्यंत सर्व शासकीय, व्यावसायीक, यात्रा, धार्मीक, क्रिडा विषयक कार्यक्रम रद्द करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले असून गांभीर्य ओळखून सर्वांनी साथरोग प्रतिबंधासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले.

दरम्यान, राज्यात आतापर्यंत २६ रुग्ण आढळून आले असून पुणे येथे १०, मुंबई ५, रायगड १, कल्याण १, अहमदनगर १, नागपूर ४, ठाणे १, यवतमाळ २, कल्याण १ रुग्ण आढळून आले आहेत.

 408 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.