शिवसैनिकांकडून खुद्द स्वपक्षीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली

‘कोरोना’ची दहशत असताना ठाणेकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या ‘मिसळ महोत्सवाचे’ आयोजन

ठाणे : जगभरातील ‘कोरोना’ आजाराचे थैमानाचे लोण आता राज्यासह ठाण्यातही उमटत आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी १५ दिवसांसाठी व्यायामशाळा, माॅल, जलतरण तलाव, चिञपटगृहांवर सरसकट बंदी लागू केली. तर ठाणे जिल्ह्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांनाही त्यांनी १५ दिवस नागरिक, मतदार किंवा लोकांचा जमाव एकत्र येऊन जमा होतील, अशा प्रकारचे कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत, असा आदेश दिला. तर दुसरीकडे ठाणे जिल्हाधिकार्‍यांनी खबरदारी म्हणून गर्दी होईल अशा सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले. तरीही ठाण्याच्या वर्तकनगर,शिवाईनगर परिसरातील शिवसैनिक दिशा ग्रुपचे भास्कर बैरीशेट्टी आणि त्यांच्या शिवसेनेच्या नगरसेविका असणार्‍या पत्नी रागिणी बैरीशेट्टी यांच्या पुढाकाराने पोखरण रोड येथील उन्नती गार्डन मैदानावर शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंञी महोदयांचे आदेश डावलून तीन दिवसीय मिसळ महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्याचे शहरभर होर्डिंग लावत दिमाखदार उदघाटनही झाले असून परिसरात नेहमी सामाजिक कार्य करणार्‍या दिशा ग्रुपच्या बैरीशेट्टी दांम्पत्याकडून तरी ‘कोरोना’चे सावट असताना नागरिकांचे जीव धोक्यात घालणार्‍या कार्यक्रमाचे आयोजन करण्याची अपेक्षा नव्हती अशी चर्चा रंगली आहे

जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका महत्वाची ठरणार
एकीकडे हिंदू नववर्षाच्या स्वागताचा मानबिंदू असणार्‍या जिल्ह्यातील गुढीपाडव्यानिमित्ताच्या शोभायाञांवर जिल्हाधिकार्‍यांनी बंदी घातलेली असताना व सातारा जिल्ह्यातील बावधनच्या पारंपारिक ‘बगाड’ याञेच्या आयोजनानिमित्त संबंधितांवर ‘कोरोना’ नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी खुद्द जिल्हाधिकारी कारवाईच्या तयारीत असताना ठाण्यातील अशा मिसळ महोत्सवावर जिल्हाधिकारी नेमकी काय कारवाई करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार असल्याचे महाराष्ट्र्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे म्हणाले

 640 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.