रोलेक्स कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करणार


अधिकारी दोषी आढळल्यास कारवाईचा बडगा उचलणार – डॉ. नितीन राऊत, ऊर्जा मंत्री यांची माहिती

मुंबई : रोलेक्स कंपनीने महावितरणला सदोष वीज मीटरचा पुरवठा करून महावितरण व ग्राहकाची फसवणूक केल्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत पावले उचलण्यात येतील. तसेच याप्रकरणात महावितरणाचे अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. याप्रकरणात कोणालाही पाठीशी घालणार नाही, अशी माहिती ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी आज विधानसभेत दिली.
रोलेक्स व फ्लॅश कंपन्यांनी महावितरणला मागील सरकारच्या काळात १० लाख वीज मीटरचा पुरवठा केला . त्यापैकी ४ लाख ३० हजार मीटर्स सदोष आढळले असून यात १६०.८०३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यापूर्वी या कंपन्याना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्यात आली आहे. नुकसान भरपाईसाठी मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. राऊत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विधानसभेत दिली.
आमदार सुनिल राऊत आणि सुनील प्रभू यांनी त्यासंबंधीचा तारांकित प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता.

 457 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.