जागतिक महिला दिनी ठाण्यात समता मेळावा

रंगारंग कार्यक्रमातून होणार स्त्री जागर

ठाणे : जागतिक महिला दिनी, महिला दिन आणि क्रांतीजोती सावित्रीबाई फुले स्मृती दिनानिमित्त ठाण्यातील विविध लोकवस्त्यांमधील स्त्री – पुरुषांचा “समता मेळावा” रविवारी, ८ मार्च रोजी समता विचार प्रसारक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. एकट्याच्या हिकमतीवर, घर संसार सांभाळणाऱ्या “एकल मातां”चा या वेळी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के व उप महापौर पल्लवी कदम यांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा मनिषा जोशी असणार आहेत.
रविवार, ८ मार्च रोजी संध्याकाळी ५.३० वाजता कॉ. गोदूताई परुळेकर उद्यानातील खुल्या रंगमंचावर होणाऱ्या या समता मेळाव्यात विविध सांस्कृतिक व जागर कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
संविधान अभ्यासक व लेखक सुरेश सावंत यांची ‘नागरिकता हक्क आणि संविधान’, यावर एकलव्य कार्यकर्ता अजय भोसले मुलाखत घेणार आहे. प्रसिद्ध कवी, गीतकार अरुण म्हात्रे स्त्री जीवना संदर्भातील कविता व गाणी सादर करणार आहेत. याशिवाय, विविध लोकवस्तीतील मुली, मुले, महिला, महिलांच्या प्रश्नावर नाटिका, नृत्य, पपेट शो, अभिवाचन, समतेची गाणी आणि एकपात्री प्रयोग आदी कार्यक्रम सादर करणार आहेत.
या कार्यक्रमात प्रवेश विनामूल्य असून, होळीच्या पूर्वसंध्येला होणा-या या रंगारंग स्त्री जागरात विविध सामाजिक संस्था,संघटनांचे कार्यकर्ते, संस्थेचे हितचिंतक व संवेदनशील ठाणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन समता विचार प्रसारक संस्थेच्या सचिव हर्षलता कदम व सह सचिव अनुजा लोहार यांनी केले आहे.

 685 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.