चेना नदीवर बांधणार दोन बंधारे

चेना नदीचे वाया जाणारे पाणी अडवून पाण्याची योजना बनविणार

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी दिले कार्यवाही करण्याचे आदेश

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केली अधिकाऱ्यासह चेना नदीची पाहणी

ठाणे : मीरा भाईंदर महापालिका हद्दीतील चेना नदीचे पाणी दरवर्षी वाया जाते. पावसाळ्यात नदी पूर्ण क्षमतेने वाहत असते. या नदीत येणारे पाणी अडवून त्या पाण्यातून मीरा भाईंदर परिसरासाठी लघु पाणी पुरवठा योजना तयार करावी या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या मागणीला यश आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत नुकतेच कार्यवाही करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्यानंतर आमदार प्रताप सरनाईक यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यासह चेना नदीच्या परिसरात येऊन पाहणी केली. या नदीवर दोन बंधारे बांधायचे असे ठरले असून येथे जलसंपदा विभाग पुढील १५ दिवसात नव्याने सर्वे करणार आहे , या योजनेतून किमान १० एमएलडी पाणी शहराला मिळू शकते अशी माहिती सरनाईक यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन समिती सभागृहात ठाणे जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी नुकतीच बैठक झाली. या बैठकीस आमदार प्रताप सरनाईक उपस्थित होते. यावेळी मीरा भाईंदर शहरातील विकास कामांबाबत चर्चा करतानाच चेना नदीचा मुद्दा सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांसमोर बैठकीत मांडला व त्यावर कार्यवाही करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते.

चेना नदीचे पाणी गेले अनेक वर्षे वाया जात आहे. नदीचे पाणी अडवून त्याचा सदुपयोग व्हावा अशी सरनाईक यांची सततची मागणी होती. २००९ पासून सरनाईक यांनी यासाठी पाठपुरावा केला होता मात्र तांत्रिक अडचणीमुळे याआधी चेना नदीवर कोणतीही पाणी योजना होण्याबाबत कार्यवाही झाली नाही व हा प्रस्ताव पडून होता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत चेना नदीवर पाणी अडविण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर आमदार प्रताप सरनाईक यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यासह चेना नदीच्या किनारी येऊन पाहणी केली. सरनाईक यांच्यासह मिरा भाईंदर महानगर पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे,पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र महाजन,उपविभागीय अभियंता धनराज पाटील,सहाय्यक अभियंता अमित पारधे, एमएमआरडीचे प्रकल्प सल्लागार डी.टी. डांगे, उप अभियंता एस. आलम, महापालिकेचे अभियंता उत्तम रणदिवे,पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे,अभियंता विश्वनाथ देशमुख हे पाहणीसाठी उपस्थित होते. यावेळी जागेवर जाऊन पाहणी करताना कोणती योजना येथे होऊ शकते याची चर्चा करण्यात आली.

ड्रोन कॅमेऱ्याने होणार चेना नदीचे सर्वेक्षण
चेना नदीवर दोन ‘कोल्हापूर टाईप’चे बंधारे बांधल्यास पाणी अडवले जाईल. दोन बंधाऱ्यातून किमान १० एमएलडी पाणी उपलब्ध होऊ शकेल. बंधारे बांधण्याचा खर्चही कमी होईल व त्याचबरोबर बंधाऱ्याचे कामही लवकर होऊ शकेल. याबाबत जलसंपदा विभागाने नव्याने तांत्रीक अभ्यास , जागेवर पाहणी व सर्वेक्षण पुढील १५ दिवसात पूर्ण करावे अशा सूचना प्रताप सरनाईक यांनी दिल्या. त्यावर चेना नदीवर कशा पद्धतीने पाणी अडविले जाऊ शकते , कुठे बंधारे बांधता येतील , किती पाणी साठा राहील , हा प्रकल्प कसा व्यवहार्य होईल यासह एकूणच जागेवर सर्वेक्षण व अभ्यास केला जाईल असे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. या कामासाठी ड्रोन कॅमेऱ्यानेही सर्वे करू , असे अधिकाऱ्यांनी सांगितले. हा सर्वे झाल्यानंतर त्याचा अहवाल बनवला जाईल व चेना नदीवर पाणी योजनेच्या पुढील कामासाठी १५ दिवसानंतर बैठक आयोजित केली जाईल , असे सरनाईक म्हणाले. आज ‘पाणी अडवा व पाणी जिरवा’ यानुसार काम करण्याची गरज असून चेना नदीवर बंधारे बांधून पाण्याचा सदुपयोग केल्यास इतर शहरांना हा प्रकल्प प्रेरणादायी ठरेल , असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला. या पाणी योजनेसाठी लागणारा निधी आपण सरकारकडून मंजूर करून आणू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अतिशय सकारात्मक आहेत व त्यांच्यामुळे मीरा भाईंदर मधील विकासकामे मार्गी लागत आहेत , चेना नदीवरही नक्कीच पाणी योजना आपल्या सरकारमुळे मार्गी लागेल असे सरनाईक म्हणाले.

पालिका आयुक्तांची प्रतिक्रिया
चेना नदीवर बंधारे बांधून पाणी अडविण्याचे काम जलसंपदा विभाग करेल व साठविलेले पाणी अंतर्गत वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून जवळच्या लोकांना म्हणजेच आसपासच्या पाड्याना पुरविण्याचे काम मीरा भाईंदर महापालिका करेल. पाणी अडवा – पाणी जिरवा या संकल्पनेप्रमाणे आमदार प्रताप सरनाईक यांनी दिलेला हा प्रस्ताव योग्य असून मीरा भाईंदर महापालिका यात वेगाने कार्यवाही करेल , असे आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी सांगितले.

स्थानिकांना होईल लाभ – प्रताप सरनाईक
चेना नदीवर बंधारे झाल्यास मीरा भाईंदर महापालिका हद्दीतील चेना व हायवे पट्ट्यातील आदिवासी पाडे व गावांना हे पाणी पुरवले जाऊ शकते. चेना नदी पाण्याची योजना झाल्यास मीरा भाईंदरला आणखी एक पाण्याचा स्त्रोत मिळेल असे सरनाईक म्हणाले. चेना व आसपासच्या भागात जे मूळ निवासी आहेत , आदिवासी ग्रामस्थ आहेत त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी आजही विहिरी आणि कूपनलिकेवर अवलंबून राहावे लागते , त्यांना आजही शुद्ध पाणी मिळत नाही अशी तक्रार आहे. चेना नदीवर पिण्याच्या पाण्याची योजना झाल्यानंतर या भागातील स्थानिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी मदत होईल , मीरा भाईंदरला शहराजवळ चेना येथे हक्काचा पाण्याचा अतिरिक्त स्त्रोत उपलब्ध होईल असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले. आज पाण्याचा एक एक थेम्ब महत्वाचा असून त्यासाठी या पाणी योजनेला महत्व देऊन आपण पाठपुरावा करू असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

 425 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.