गतवर्षी राज्यात कर्करोगाने ५ हजार ७२७ दगावले

निरंजन डावखरे यांच्या तारांकित प्रश्नावर – आरोग्य मंत्री

मुंबई : राज्यात २०१९ मध्ये कर्करोगाचा ११ हजार ३०६ नागरिकांना प्रार्दुभाव झाला असल्याचे आढळले असून, ५ हजार ७२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज विधान परिषदेत दिली.
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, निरंजन डावखरे यांच्यासह काही सदस्यांनी तारांकित प्रश्नाद्वारे राज्यातील कर्करुग्णांच्या वाढत्या संख्येबाबत मुद्दा उपस्थित केला होता. देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात ९ टक्के रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांवरील उपचारांच्या सुविधेबाबत आमदार डावखरे यांनी प्रश्न मांडला.
आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, राज्यात २०१९ मध्ये ५ हजार ७२७ रुग्णांचे मृत्यू झाले. राज्यातील ३६ जिल्ह्यापैकी ११ जिल्हा रुग्णालयांमध्ये केमोथेरपीची सुविधा उपलब्ध करण्यात आली. उर्वरित जिल्ह्यात महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत नोंदणीकृत खासगी रुग्णालयात सुविधा उपलब्ध केली आहे. रत्नागिरी येथील केमोथेरपी केंद्रात जानेवारीपर्यंत ४५ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.” होप ऑफ लाईफ संस्थेने राज्यात तीन हजार रुग्णांमागे एक तज्ज्ञ डॉक्टर असल्याचे म्हटले होते, याबाबत आमदार निरंजन डावखरे यांनी लक्ष वेधले. त्यावेळी मंत्री टोपे यांनी राज्यात तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या कमी असल्याचे मान्य केले. मात्र, होप ऑफ लाईफने राज्यात असंसर्गजन्य आजाराबाबात अभ्यास केला नसल्याचे स्पष्ट केले. राज्यातील ११ जिल्ह्यातील केमोथेरपी केंद्रातील फिजीशइयन व स्टाफ नर्स यांना टाटा मेमोरियल हॉस्पीटल येथे एक महिन्याचे केमोथेरपीचे प्रशिक्षण देण्यात आले. आतापर्यंत १६ जिल्हा रुग्णालयातील फिजीशियन व स्टाफ नर्सना प्रशिक्षण दिले असून, २०२०-२१ पर्यंत उर्वरित जिल्ह्यातील फिजीशियन व स्टाफ नर्सला प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षित मनुष्यबळाच्या उपलब्धततेनुसार केमोथेरपी सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत कार्यवाही सुरू आहे,” असे राजेश टोपे यांनी सांगितले.

 800 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.