दुर्मिळ शल्यचिकित्से मुळे जेष्ठ नागरिकाच्या किडन्या वाचविण्यात यश

दोन्ही किडन्यांना ट्युमर असल्याने काढून टाकण्याचा दिला होता सल्ला


नवी मुंबई : चेंबूर येथे राहणारे नंदकिशोर सानप ( वय ७१ नाव बदललेले आहे) गेली सहा महिने किडनीच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्या डाव्या बाजूच्या किडनीला ६ सेंटीमीटरचा ट्युमर होता तसेच त्यांच्या उजव्या किडनीला पेलविक ट्युमर असल्यामुळे अनेक डॉक्टरांनी दोन्ही किडन्या काढून टाकण्याचा सल्ला दिला होता परंतु त्यांच्या वयाचा विचार करता व शरीरातील इतर आजारांची गंभीरता लक्षात घेता किडनी काढतेवेळी त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता व पुढील आयुष्य हे डायलासिसवर काढावे लागणार होते हेच ओळखून नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलचे किडनीविकार तज्ञ डॉ. निशांत काठाळे यांनी आधुनिक उपचार पद्धतीने किडनीच्या ट्युमरवर उपचार करण्याचे ठरविले.

याविषयी अधिक माहिती देताना तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलचे किडनीविकार तज्ञ निशांत काठाळे सांगतात, ” किडनी हा आपल्या शरीराचा महत्वाचा भाग आहे. आपल्या शरीरातील दोन्ही किडन्या जर फेल झाल्या तर फक्त डायलासिसचा पर्याय रूग्णासमोर राहतो. या केसमध्ये नंदकिशोर यांच्या दोन्ही किडन्यांची वैद्यकीय तपासणी केली असता त्यांच्या डाव्या बाजूच्या किडनीला असलेला ट्युमर हा रक्त पुरवठा करणाऱ्या महत्वाच्या धमन्यांमध्ये होता व उजव्या बाजूच्या किडनीच्या जवळ पेलविक ट्युमर होता अशा केसमध्ये किडनीसकट हे ट्युमर काढला जातो ज्याला रॅडिकल नेफ्रेअक्टोमी म्हणतात, म्हणजेच संपूर्ण मूत्रपिंड, मूत्रपिंडाभोवती असलेल्या चरबी , गाठ अथवा ट्युमर आणि मूत्रपिंडाला मूत्राशय (मूत्रमार्गाशी) जोडणाऱ्या नलिकेचा भाग काढला जातो: परंतु तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाने आम्ही मूत्रपिंड म्हणजेच किडनी न काढता ते दोन्ही ट्युमर काढण्याचा निर्णय घेतला. अशा केसमध्ये अर्धा तासामध्ये तुम्हाला शरीरातील या नाजूक भागाचे ऑपेरेशन करावयाचे असते, या दुर्मिळ केसमध्ये आमच्या निष्णात टीमने हे काम यशस्वीरीत्या पार पडले. दोन्ही किडन्यांना कोणताही धोका न पोहचवता आम्ही दोन्ही किडन्यांचे ट्युमर काढून टाकले, नवी मुंबईत अशी ही पहिलीच शल्यचिकित्सा असून रुग्णाला दोनच दिवसांमध्ये घरी पाठविण्यात आले आहे. किडनी किंवा रेनल कॅन्सरचा विचार केल्यास संख्यातः महिलांपेक्षा पुरुषांना असे किडनी ट्युमर होण्याची शक्यता जास्त असते.”
जेंव्हा एखाद्या रुग्णाच्या शरीरातील दोन्ही किडन्या निरुपयोगी असतात अथवा काढल्या जातात तेंव्हा त्याला पुढील आयुष्य हे डायलासिसवर काढावे लागते परंतु या केसमध्ये आम्ही सदर रुग्णाच्या दोन्ही किडन्या वाचविण्यात यशस्वी ठरलो; ही दुर्मिळ व किचकट असलेली शल्य चिकित्सा सध्या नवी मुंबईमध्ये तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपल्बध आहे. या शल्यचिकित्सेमुळे नंदकिशोर सानप हे पुढील आयुष्य डायलासिस मुक्त जगणार असून त्यांनी किडनीविकारतज्ञ निशांत काठाळे व तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलमधील इतर डॉक्टरांचे आभार मानले. तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलने सदर रुग्णाला आर्थीक मदत सुद्धा मिळवून दिली.

 477 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.