आरक्षणाचा दिग्गजांना फटका

अंबरनाथ नगरपालिका निवडणूक जाहीर


अंबरनाथ : अंबरनाथ पालिकेच्या येत्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रभागाचे आरक्षण जाहीर झाले. यात सर्वच पक्षाच्या बहुतेक दिग्गज सदस्यांचे प्रभाग आरक्षित झाले आहेत. आता त्यांना दुसरा प्रभागात जावे लागण्याची जोरदार चर्चा पालिका वर्तुळात सुरु होती.
पालिकेच्या सभागृहात आज सकाळी उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग आरक्षणाची प्रक्रिया पार पडली. मुख्याधिकारी देविदास पवार, निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी अविनाश सणस यांनी सहकार्य केले. पालिका शाळेच्या राधिका जाधव आणि अंजली खेडेकर या विद्यार्थिनींनी सोडतीच्या चिठया काढल्या.
सत्ताधारी शिवसेना गटातील एका गटाच्या नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित झाले तर दुसऱ्या दोन्ही गटातील नगरसेवकांचे प्रभाग सुरक्षित झाले आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील, कार्याध्यक्ष उमेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सदाशिव पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सचिन पाटील यांचे प्रभाग विविध गटासाठी आरक्षित झाल्याने त्यांना अन्य प्रभागतून निवडणूक लढवावी लागणार आहे. महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे शहर अध्यक्ष कुणाल भोईर यांचा प्रभागही सुरक्षित झाला आहे.
विद्यमान नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांचा प्रभाग अनुसूचित जातींसाठी आरक्षित झाला आहे. माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांचा प्रभाग अनूसूचित जाती महिलांसाठी आरक्षित झाला आहे तर एड. निखिल वाळेकर यांचा प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला आहे. शिवसेनेचे उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांचा प्रभाग सर्वसाधारण झाला आहे. शिवसेनेचे पंढरीनाथ वारिंगे यांचा प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाला आहे तर त्यांच्या पत्नी पन्ना वारिंगे यांचा प्रभाग सर्वसाधारण झाला आहे. शिवसेनेचे गटनेते राजेश शिर्के यांचा प्रभाग अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित झाला आहे.
भाजपचे मावळते शहर अध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक भरत फुलोरे यांचा प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाला आहे. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुनील सोनी यांचा प्रभाग सुरक्षित झाला आहे. भाजपच्या महिला बालकल्याण समितीच्या सभापती अनिता आदक यांचा प्रभाग सर्वसाधारण झाला आहे.
या आरक्षण सोडती संबंधी सूचना वा हरकती घेण्यासाठी चार मार्च पर्यंत मुदत देण्यात आली आहे. ज्यांना सूचना वा हरकती घ्यायच्या असतील त्यांनी लेखी स्वरूपात द्याव्यात असे आवाहन उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे यांनी केले आहे.
अंबरनाथ शहरात एकूण ५७ प्रभाग आहेत. अनुसूचित जमाती साठी दोन प्रभाग त्यातील एक महिलांसाठी. अनुसूचित जातीसाठी ८प्रभाग आरक्षित असून त्यातील चार महिलांसाठी आरक्षित आहेत. नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग करीता १५ प्रभाग आरक्षित असून त्यातील आठ प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. सर्वसाधारण महिलांसाठी १६ प्रभाग आरक्षित ठेवण्यात आले आहेत.


 472 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.