ठाणे : दिव्यातील शीळ परिसरातील भट्टी गल्ली येथे गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास फर्निचरच्या गोडाऊनला अचानक भीषण आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठे नुकसान झाले. त्या आगीवर सुमारे तीन तासांनी नियंत्रण मिळविण्यात यश आल्याची ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.
दिवा,शीळ, भट्टी गल्ली, येथे अबिद खान यांच्या मालकीच्या सुमारे ९०० स्क्वेअर फुट क्षेत्रफळाच्या कपाट व प्लायवूड असलेल्या लाकडी फर्निचरच्या गोडाऊनला गुरुवारी सकाळी आग लागल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळताच शीळ अग्निशमन केंद्राचे स्थानक अधिकारी सरनोबत आणि अग्निशमन दलाचे जवान यांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने जवानांनी बचावकार्य सुरू करत आगीवर नियंत्रण मिळविले.
या आगीत गोडाऊनमधील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. सकाळी ११.०१ वाजता आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिकविण्यात यश आले. या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. यावेळी दोन फायर इंजिन व एक रेस्क्यू वाहन पाचारण करण्यात आल्याची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.






1,919 total views, 1 views today