नळपाडा, कापुरबावडी आणि माजिवाडा परिसरातील पुनर्जीवित विहिरींचे लोकार्पण

ठाणे, दि. १३ मे, २०२६ : शहरातील वाढते नागरीकरण आणि त्यातून निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर प्रभावी उपाय म्हणून नळपाडा, कापुरबावडी आणि माजिवाडा परिसरातील जुन्या विहिरींचे पुनरुज्जीवन करण्यात आले असून, त्यावर आर.ओ. प्लांट उभारून नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे लोकार्पण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला माजी महापौर एच.एस. पाटील, नगरसेवक संजय भोईर, मुकेश मोकाशी, नगरसेविका उषा भोईर, सपना भोईर, स्नेहा आंब्रे, आशादेवी सिंह, शिवसेना विधानसभा सचिव संदीप डोंगरे, उपशहरप्रमुख सट्रिक आयझ्याक, विभागप्रमुख भगवान देवकते, शाखाप्रमुख शैलेंद्र नाईक, उमेश गुरव, सामाजिक कार्यकर्ते रमेश आंब्रे यांच्यासह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की, ठाणे शहरातील अनेक विहिरी कालांतराने बुजविण्यात आल्या किंवा कचरा व सांडपाण्यामुळे दूषित झाल्या. परिणामी, नैसर्गिक जलस्रोत नष्ट होण्याच्या मार्गावर होते. ही बाब लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात ठाणे व मिरा-भाईंदर शहरांतील ४६ विहिरींच्या पुनरुज्जीवनासाठी सुमारे ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. या निधीतून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत विहिरींची वैज्ञानिक पद्धतीने साफसफाई, गाळ काढणे आणि संरक्षक उपाययोजना करून त्यांना पुन्हा जिवंत करण्याचे काम सुरू आहे. तसेच, या विहिरींवर आर.ओ. प्लांट बसविण्याचे कामही प्रगतीपथावर आहे. सध्या वाढत्या उन्हाळ्यामुळे महानगरपालिकेकडून होणारा पाणीपुरवठा अपुरा पडत असताना किंवा तांत्रिक कारणांमुळे तो खंडित झाल्यास नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत पुनर्जीवित विहिरी आणि त्यावर बसविण्यात आलेले आर.ओ. प्लांट नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहेत.

या प्रकल्पांतर्गत विहिरींमधील पाण्याचे नैसर्गिक स्रोत जपले जात असून, सांडपाणी मिसळण्यास प्रतिबंध केला जात आहे. विहिरींच्या संरक्षणासाठी जाळ्या बसविणे, भिंतींचे मजबुतीकरण करणे तसेच नियमित स्वच्छता राखणे अशा उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यामुळे विहिरींतील पाणी शुद्ध आणि सुरक्षित राहणार आहे.

या उपक्रमामुळे एप्रिल-मे महिन्यांत भासणारी तीव्र पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार असून, नागरिकांना वर्षभर शुद्ध पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

४६ विहिरीं पैकी १२ विहिरीचे काम पूर्ण झाले असून दर आठवड्याला ३ ते ४ विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याचा मानस आहे. हा उपक्रम पुढील काळात संपूर्ण शहरात राबविण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले.

नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करणारा हा विहिरींच्या पुनरुज्जीवनाचा उपक्रम आदर्श ठरत असून, राज्यातील इतर शहरांतही अशा उपक्रमांची अंमलबजावणी व्हावी, असे आवाहनही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

 64 total views,  1 views today