नेट निंजासला विजेतेपद


एनएमएसए मेट्रो ग्रुप बॅडमिंटन सुपर लीग स्पर्धा.
ठाणे : संपूर्ण स्पर्धेत विजयी वाटचाल करणाऱ्या नेट निंजास संघाने स्केचप्ले स्मॅशर्स संघाचा ३-१ असा पराभव करत नवी मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय एनएमएसए मेट्रो ग्रुप बॅडमिंटन सुपर लीग स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
रवी श्रीवास्तव आणि सनी दुग्गल या जोडीने सलामीच्या लढतीत आदित्य ओक आणि सुशांत शेट्टी या जोडीवर २१-१७ अशी सरशी मिळवत संघाला विजयाचा पहिला गुण मिळवून दिला. पण पुढच्याच लढतीत मन गजरा आणि शुभम पाल यांनी आदित्य अर्दे – शैलेश सिंग या जोडीचा २१-१२ असा सहज पराभव करत स्केचप्ले स्मॅशर्सला सामन्यात १-१ अशी बरोबरी साधून दिली. या बरोबरीनंतर अक्षय कदम आणि शिवानी हेर्लेकर यांनी अरित्र सरकार अपूर्वा आचरेकर या जोडीला २१-८ असे सहज नमवत नेट निंजासच्या खात्यात आणखी एक गुण जमा केला. चौथ्या लढतीत अक्षय कदम आणि शैलेश सिंग यांनी राजेंद्र लोहार आणि शुभम पाल या जोडीचे आव्हान २१-१४ असे परतवून लावत निर्णायक विजयासह नेट निंजासच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. विजेत्या संघाला ७० हजार रुपयांच्या रोख बक्षिसाने गौरविण्यात आले. मराठा वॉरियर्स संघ तिसऱ्या स्थानी राहिला. विजेत्या नेट निंजास संघातील अक्षय कदम आणि शिवानी हेर्लेकर यांची अनुक्रमे स्पर्धेतील सर्वोत्तम पुरुष आणि महिला बॅडमिंटनपटू म्हणून निवड करण्यात आली.
राष्ट्रीय खेळाडू निर्मला कोटणीस, मेट्रो ग्रुपचे सुरेश जैन, हितेश जैन, एनएमएसएचे संजय निकम, प्रकाश श्रीनिवासन, आयोजन समितीचे श्रीशैल मिटकरी, समीर नायर, श्रीप्रकाश यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.

 5,282 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.