यंग स्टार, चेंबूर जिमखाना अंतिम फेरीत

निर्णायक लढतीत यंग स्टार क्रिकेट क्लबचा सामना प्रभू जॉली जिमखान्यावर तिन धावांनी विजय मिळवणाऱ्या चेंबूर जिमखाना संघाशी होईल.
मुंबई : यंग स्टार क्रिकेट क्लबने यजमान कुर्ला स्पोर्ट्स क्लबचा ९ विकेट्सनी दणदणीत पराभव करत बापट ढाल स्मृती क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. निर्णायक लढतीत त्यांचा सामना प्रभू जॉली जिमखान्यावर तिन धावांनी विजय मिळवणाऱ्या चेंबूर जिमखाना संघाशी होईल.
कुर्ला स्पोर्ट्स क्लबने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९ बाद ११८ धावा केल्या. नितेश कहरने ४३ आणि अझीम डायतरने नाबाद २३ धावा केल्यामुळे यजमानांना शतकी धावसंख्या उभारता आली. यजमानांच्या फलंदाजीवर अंकुश लावताना अनिकेत क्षीरसागरने १३ धावांत ४ आणि वसीम अश्रफने १७ धावांत ३ विकेट्स मिळवल्या. यंग स्टार क्रिकेट क्लबने १६.१ षटकात १२२ धावांसह विजय साकारला. मेहुल गोकाणीने ५४ आणि अजित पेहलवानने नाबाद ५१ धावा करत संघाला सोपा विजय मिळवून दिला.
अन्य लढतीत चेंबूर जिमखान्याचे २० षटकात ७ बाद १४५ धावांच्या आव्हानाचा सामना करताना प्रभू जॉली जिमखान्याला २० षटकात ५ बाद १४२ धावापर्यंत मजल मारता आली. फैझान रबानी आणि प्रतीक चव्हाणने प्रत्येकी ५१ धावांची खेळी करूनही प्रभू जॉली जिमखान्याला पराभव पत्करावा लागला. चेंबूर जिमखान्याच्या आयुष बिडवईने ३३, समर्थ शेट्टीने २३, केतन नेमाडे आणि आर्यन कपूरने प्रत्येकी २० धावा केल्या.

 157 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.