एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब (अ) दुसऱ्या फेरीत

एरवी राजकीय आखाड्यात वर्चस्व गाजवणाऱ्या कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपण क्रिकेटमध्ये फटकेबाजी करण्यात माहीर असल्याचे दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये दाखवून दिले. यावेळी ठाणे जिल्ह्याच्या विकासासाठी विद्यमान राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे सांगून या मैदानावर आयपीएलचे सामने खेळवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

ठाणे : एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब (अ ) संघाने स्पोर्ट्समन क्रिकेट क्लबचा १२२ धावांनी धुव्वा उडवत महाराष्ट माझा सेवा संस्था आयोजित ठाणे प्रिमियर लीग – मुख्यमंत्री चषक टी – २० लीग क्रिकेट स्पर्धेत विजयी शुभारंभ केला. विजयासाठी १९१ धावांचा पाठलाग करणाऱ्या स्पोर्टसमन क्रिकेट क्लबला अवघ्या ६८ धावांत गुंडाळत एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब (अ) संघाने आगेकूच केली.
दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृहात झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकल्यावर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्पोर्टसमन क्रिकेट क्लबने घेतला. ढगाळ वातावरणात एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब (अ) संघाच्या फलंदाजांनी प्रतिस्पर्धी गोलंदाजांना वरचढ होऊ न देता २० षटकात ९ बाद १९१ धावांचे आव्हान उभे केले. अखिल हेरवाडकरने ७१ आणि शशिकांत कदमने ३९ धावांचे योगदान दिले. निपुण पांचाळने नाबाद १७ धावांची खेळी केली. अकीब शेखने ३ तर जय चौगुलेने २ विकेट्स मिळवल्या.
उत्तरादाखल स्पोर्टसमन क्रिकेट क्लबचा डाव १८.१ षटकात अवघ्या ६८ धावांत आटोपला. त्यांच्या संकेत यशवंते (१२) आणि अकिब शेखचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी धावा करता आल्या नाहीत. विजेत्यांच्या विद्याधर कामतने ३, मोहित अवस्थी आणि यश चौहानने प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या.
खासदारांची फटकेबाजी
एरवी राजकीय आखाड्यात वर्चस्व गाजवणाऱ्या कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपण क्रिकेटमध्ये फटकेबाजी करण्यात माहीर असल्याचे दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये दाखवून दिले. यावेळी ठाणे जिल्ह्याच्या विकासासाठी विद्यमान राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे सांगून या मैदानावर आयपीएलचे सामने खेळवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

संक्षिप्त धावफलक : एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब (अ) संघ : २० षटकात ९ बाद १९१ ( अखिल हेरवाडकर ७१, शशिकांत कदम ३९, निपुण पांचाळ नाबाद १७, अकिब शेख ४-३२-३, जय चौगुले ४-४०-२) विजयी विरुद्ध स्पोर्ट्समन क्रिकेट क्लब : १८.१ षटकात सर्वबाद ६८ ( संकेत यशवंते १२, अकिब शेख १०, विद्याधर कामत ४-११-३, मोहित अवस्थी २-७-२, यश चौहान ४-१-१९-२).

 8,700 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.