भारत, केनिया महिलांच्या उपांत्य फेरीत

सहावी विश्वकरंडक रोलबॉल स्पर्धा : पुरुष गटातून भारत, केनिया, बेलारूस व सेनेगल उपांत्यपूर्व फेरीत.

पुणे : महिलांच्या अ गटातून केनिया तर ब गटातून भारताने सहाव्या विश्वकरंडक रोलबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. पुरुषांच्या अ गटातून भारताने, ब गटातून केनियाने, क गटातून बेलारूसने तर ड गटातून सेनेगल संघाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती स्टेडीयम येथे सुरु असलेल्या स्पर्धेत पुरुष गटात भारतीय संघाने आर्जेन्टीना संघाला ९-१ असे पराभूत करताना स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला भारताने ४-० अशी आघाडी घेताना लढतीवर वर्चस्व मिळविले होते. आकाश गणेशवाडे (४.४०, १५.१५, ३६.३०) व श्रीकांत साहू (१२.२७, २६.०२, ३०.०७ ) यांनी प्रत्येकी ३ , हर्षल घुगेने २ (१७.२५, २१.२७) तर आदित्य सुतारने १ (२८.५५) गोल करताना संघाला विजय मिळवून दिला. आर्जेन्टिना संघाकडून इमिलानो जेससने (३२.१०) एक गोल केला.
उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यासाठी भारताने आर्जेन्टीना, फिजी, पोलंड, इजिप्त व युगांडा या संघाचा पराभव केला. दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत सहभागी होण्यासाठी पोलंड व इजिप्त या दोन संघात चुरस आहे.
पुरुषांच्या ब गटातून केनिया संघाने सियारा लीवोन, श्रीलंका, फ्रांस व इराण संघाना पराभूत करताना उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित केला आहे. पुरुषांच्या क गटातून बेलारूस संघाने सौदी अरेबिया, नेपाळ, ओमान व ब्राझील संघांचा पराभव करताना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ड गटातून सेनेगल संघाने न्यूझीलंड, इंग्लंड, लॅटव्हिया संघाना पराभूत करताना उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित केला.
महिला विभागातून भारताने सियारा लीवोन संघाला ९-० असे पराभूत करताना ब गटातून उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. मध्यंतराला ५-० अशी आघाडी घेतली होती. इशिका शर्मा (०.५०, १६.२२), कर्णधार एस. सुस्मिथा (१८.३५, २२.५५ ), श्रुती भगत (१९.३०,२९.४०) यांनी प्रत्येकी २ तर देवांशी पटेल (३२.५०), पूजा चौधरी (१३.१५) व खुशी वानखेडे (२५.००) यांनी प्रत्येकी १ गोल केला. सियारा लीवोन संघाकडून एकाही खेळाडूला गोल करता आला नाही.
महिलांच्या ब गटातून भारताने सियारा लीवोन, पोलंड, लॅटव्हिया व आर्जेन्टिना संघाना पराभूत करताना थेट उपांत्य फेरी गाठली. दुसऱ्या स्थानासाठी लॅटव्हिया व पोलंड या दोन संघात चुरस असणार आहे. महिलांच्या अ गटातून केनिया संघाने इजिप्त संघाला पराभूत करताना स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. याच गटातून दुसऱ्या स्थानासाठी इजिप्त व फ्रांस हे एकमेकांच्या समोर असणार आहेत.
तत्पूर्वी, साखळी लढतीमध्ये महिला गटात श्रीलंका संघाने नेपाळ संघाला ६-१ असे पराभूत करताना आगेकूच केली. मध्यंतराला ४-१ अशी श्रीलंका संघाने आघाडी घेतली होती. एम. डी. दिदुलानीने ३, नावेदाने २ तर चलानी एस ने एक गोल करताना संघाला विजय मिळवून दिला. नेपाळ संघाकडून बितीशा महार्जनने एक गोल केला.

 128 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.