स्पोर्टींग क्लब कमिटीला विजेतेपद

हर्षित बोबडे आणि अनुज चौधरी या स्पोर्टींग क्लब कमिटी संघाच्या सलामीच्या जोडीने १३.१ षटकात १०५ धावा करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

ठाणे : स्पोर्टींग क्लब कमिटी संघाने गिअर क्रिकेट क्लिनिक संघाचा १० विकेट्सनी दणदणीत पराभव करत संदीप दहाड अकॅडेमी आयोजित १२ वर्षाखालील मुलांच्या मर्यादित १५ षटकांच्या ठाणे ज्युनियर लीग क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले.
सेंट्रल मैदानात खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात गिअर क्रिकेट क्लिनिक संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यावर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय फलदायी ठरला नाही. प्रेरित राऊत (३७), अथर्व तळवलकर ( १९), सार्थ वसईकर (१३) आणि अवांतर २२ धावांमुळे गिअर क्रिकेट क्लिनिक संघाच्या खात्यात १५ शतकात ८ बाद १०४ धावा जमा झाल्या. अतुल वर्माने १२ धावांत ४ आणि पार्थ राणेने दोन आणि विजय सिंगने एक विकेट मिळवली. उत्तरादाखल हर्षित बोबडे आणि अनुज चौधरी या स्पोर्टींग क्लब कमिटी संघाच्या सलामीच्या जोडीने १३.१ षटकात १०५ धावा करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. हर्षितने ४३ चेंडूत नाबाद ५९ तर अनुजने नाबाद २७ धावांची खेळी केली.
जेष्ठ क्रिकेटपटू राज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या स्पोर्टींग क्लब कमिटी संघाने कर्णधार पार्थ राणेच्या नेतृत्वाखाली स्पर्धेत चांगलीच छाप पाडली. १२ संघाचा सहभाग असलेल्या स्पर्धेत संघाला अपराजित राखताना पार्थने मोलाचे योगदान दिले. संघाला उपांत्य फेरीत स्थान मिळवून देताना मुंबई क्रिकेट क्लब विरुद्धच्या सामन्यात पार्थने नाबाद ५५ धावांची अर्धशतकी खेळी केली होती. उपांत्य फेरीत स्पोर्टींग क्लब कमिटी संघाच्या १३९ धावांचा पाठलाग करणाऱ्या ए फोर क्रिकेट अकॅडमी संघाला ११४ धावांवर रोखताना पार्थने चार विकेट्स मिळवल्या होत्या. याशिवाय मुंबई क्रिकेट संघटना आयोजित १२ वर्ष वयोगटाच्या भास्कर ट्रॉफी स्पर्धेतील चौथ्या फेरीच्या लढतीत नाबाद ११२धावांची शतकी खेळी करत पार्थने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. ठाणे ज्युनिअर स्पर्धा जिंकल्यावर संघाचे प्रशिक्षक राज जाधव म्हणाले, संपूर्ण स्पर्धेत मुलांनी विजयाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून खेळ केला. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात देखील ही मुलं कुठे मागे पडली नाहीत.
संक्षिप्त धावफलक : गिअर क्रिकेट क्लिनिक : १५ षटकात ८ बाद १०४ ( प्रेरित राऊत ३७, अथर्व तळवलकर १९, सार्थ वसईकर १३, अतुल वर्मा ३-१२-४, पार्थ राणे ३-२४-२, विजय सिंग २-८-१) पराभुत विरुद्ध स्पोर्टींग क्लब कमिटी : १३.१ षटकात बिनबाद १०५ (हर्षित बोबडे नाबाद ५९, अनुज चौधरी नाबाद २७).

 38,521 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.