शहरातील महिलांचे स्तनाच्या स्वतपासणीकडे दुर्लक्ष

मुंबईत शंभरपैकी दहा महिला करतात स्तनाची स्वतपासणी

ठाणे : साधारपणे कर्करोगाचे लोकसंख्येशी व इतर आजारांशी असलेले प्रमाण सतत वाढत आहे. हे खरे असले तरी त्याची कारणेदेखील अनेक आहेत. लोकशिक्षणामुळे विशिष्ट लक्षणे आढळल्यास रुग्ण जागरुकपणे डॉक्टरांकडे जातात. त्यामुळे पूर्वीपेक्षा रुग्णांची नोंद होण्याचे प्रमाण वाढले आहे परंतु  मुंबईतील आरोग्य क्षेत्रात महत्वाचे योगदान असलेल्या अपेक्स हॉस्पिटल समूहाने केलेल्या एका सर्वेक्षणामध्ये मुंबईतील महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाबाबत अनास्था दिसून आली आहे. बोरिवली येथील अपेक्स हॉस्पिटल समूहाने नुकताच शंभर महिलांमध्ये स्तनाची स्वतपासणी बाबत एक सर्वेक्षण केले होते यापैकी फक्त १० महिला या नियमित स्तनाची स्वतपासणी  करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. याविषयी अधिक माहिती देताना अपेक्स हॉस्पिटल समूहाच्या कर्करोगजन्य आणि कर्करोग नसलेल्या स्थितींसाठी स्तनाच्या शस्त्रक्रिया करणाऱ्या शल्यचिकित्सक  डॉ. अदिती अग्रवाल म्हणाल्या, ” कर्करोग अर्थात कॅन्सर असा साधा उल्लेख निघाला तरी भल्या भल्यांचा थरकाप उडतो. पण, या आजाराचे योग्यवेळी अचूक निदान झाले तर प्रगत उपचार पद्धतीमुळे या  भीतीवर मात करता येऊ शकते. विविध टप्प्यांवर कर्करोगाला आवर घालणे त्यामुळे शक्य झाले आहे. इतकेच नाही, तर याची लक्षणे अचूक ओळखता आल्यास या आजारातून कायमची मुक्ती होण्यापर्यंत विज्ञान पोहोचले आहे. पहिल्या टप्प्यातील  ९० टक्के स्तनाचा कर्करोग योग्य उपचारांनी पूर्णपणे बरा होतो. त्यामुळे विशीपासूनच स्तनांची स्वतपासणी करा, चाळीशीनंतर वर्षातून एकदा आरोग्यतज्ज्ञांकडून तपासणी करून घ्या, किंचितशी गाठ असली तरी मॅमोग्राफी तपासणी करून घ्या आणि कर्करोगाचे निदान झालेच तर न घाबरता व धीर न सोडता तातडीने उपचार सुरू करणे गरजेचे आहे. भारतीय महिलांमध्ये स्तन कर्करोग हा दुसऱ्या क्रमांकाचा कर्करोग ठरला आहे. ग्रामीण भागामध्येही या कर्करोगाचे प्रमाण वाढले असून, २० ग्रामीण महिलांमागे एका महिलेमध्ये स्तन कर्करोग आढळून येत आहे. त्याचवे‌ळी शहरी महिलांमध्ये हे प्रमाण आणखी वाढले आहे. या कर्करोगामागे अजूनही कोणतेच ठोस कारण सापडले नसले तरी स्थुलपणा, अपत्यप्राप्ती न होणे किंवा उशिरा होणे, ‘पीसीओडी’, अतिमद्यपान, लठ्ठपणा व अनुवंशिकता अशी काही कारणे स्तन कर्करोगाला कारणीभूत ठरत आहेत.”
भारतातील महिला  स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे उपचाराला येणाऱ्या स्तनाचा कर्करोग झालेल्या  महिला  या तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात आजार पोहोचल्यानंतर येतात. वास्तविकत: स्त्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे योग्यवेळी निदान झाले तर त्यावर मात करण्याची शक्यता ही ९० टक्क्यांपर्यंत असते. स्तनात गाठ येणे , द्राव येणे, स्तन  आतमध्ये वळणे , आकार वाढणे सततच्या  वेदना व पाठदुखी अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे असे मत अपेक्स हॉस्पिटल समूहाच्या डॉ. अदिती अग्रवाल यांनी व्यक्त केले.

 108,968 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.