मुंबई श्रीचे तीन वर्षांनंतर दणदणीत पुनरागमन

मुंबई श्रीला पुन्हा एकदा स्पार्टन न्यूट्रिशनची ताकद, येत्या शुक्रवार-शनिवारी स्पर्धेचे शहाजी राजे क्रीडा संकुलात धमाकेदार आयोजन

मुंबई : कोरोनाच्या संकटात होरपळून निघालेल्या फिटनेस इंडस्ट्रीला तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मुंबई श्रीचे पीळदार ग्लॅमर अनुभवता येणार आहे. एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसारखाच दर्जा आणि मान-सन्मान असलेल्या मुंबई श्रीला यंदाही स्पार्टन न्यूट्रिशनचे आर्थिक पाठबळ लाभले आहे. येत्या ३१ मार्च आणि १ एप्रिलला होणार्‍या या स्पर्धेला सलग तिसर्‍या वर्षी स्पार्टन मुंबई श्री म्हणून ओळखले जाईल. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईतील शरीरसौष्ठवपटूंच्या हृदयात सर्वोच्च स्थानी असलेल्या या स्पर्धेचे यंदाही दिमाखदार आयोजन केले जाणार असल्याची ग्वाही बृहन्मुंबई आणि उपनगर शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अमोल कीर्तीकर आणि अजय खानविलकर यांनी दिली.
शरीरसौष्ठवपटूंचे पहिले प्रेम असलेल्या आणि लखपती करणार्‍या या स्पर्धेच्या आयोजनासाठी गेले दोन महिने बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटना जोरदार तयारी करत आहे. मुंबई शरीरसौष्ठवपटूंसाठी नेहमी सर्वोच्च असलेल्या मुंबई श्री चा रूबाब आणि थरार दोन दशकानंतर अंधेरीच्या शहाजीराजे क्रीडा संकुलात केला जाणार आहे. या स्पर्धेसाठी क्रीडाप्रेमी सुबोध मेनन यांचेही सहकार्य लाभले आहे.
अडीचशे खेळाडूंचा सहभाग
मुंबई श्री म्हणजे दिमाखदार आयोजन नव्हे तर खेळाडूंना श्रीमंत करणारीr स्पर्धा. या लौकिकानूसार मुंबई श्री स्पर्धेत किमान २५० खेळाडू सहभाग घेतील, असा प्राथमिक अंदाज आहे. निलेश दगडे, रोहन गुरव,सुशांत रांजणकर, उमेश गुप्ता, सुशांत पवार, दिपक तांबिटकरसारखे खेळाडू आपले मुंबई श्रीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करतील. त्यामुळे स्पर्धेतील विजेत्याला सवा लाखांचे इनाम दिले जाणार आहे. तसेच द्वितीय विजेता आणि तृतीय विजेत्याला अनुक्रमे ५० आणि २५ हजार रुपयांचे रोख इनाम दिले जाईल. ही स्पर्धा एकंदर आठ गटात होणार असून गटातील अव्वल पाच खेळाडूंना १०,८,६,४,२ हजार रोख बक्षीस लाभेल. एवढेच नव्हे तर पुढील पाच क्रमांकानाही एक हजारांचे उत्तेजनार्थ बक्षीस दिले जाईल. या स्पर्धेत खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्यामुळे वजन तपासणी आणि प्राथमिक चाचणी ३१ मार्चला स्पर्धेच्या ठिकाणीच केली जाणार असल्याची माहितीr संघटनेचे सरचिटणीस राजेश सावंत यांनी दिली.
महिला आणि फिटनेस फिजीक खेळाडूंनाही मुंबई श्रीचे वेध
शरीरसौष्ठव खेळात आता राष्ट्रीय पातळीवर महिलांचे प्रमाण हळू वाढू लागले आहे. मुंबईतही या खेळाकडे करिअर म्हणून पाहणार्‍या महिलांची संख्या झपाट्याने वाढतेय. अशा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी महिलांची मिस मुंबई शरीरसौष्ठव स्पर्धाही असेल. तसेच फिटनेसवेड्या खेळाडूंमध्ये फिटनेस फिजीकची प्रचंड क्रेझ असल्यामुळे यांचेही उंचीचे दोन गट असून अव्वल पाच खेळाडूंनाही रोख इनाम दिले जाणार आहे. या गटात खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत असून किमान ७५ खेळाडू या दोन्ही गटात उतरतील, अशी माहिती सरचिटणीस सुनील शेगडे यांनी दिली.

 272 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.