राज्य कॅरम स्पर्धेत संदीप – काजल अंतिम विजेते

अंतिम फेरीत संदीपने संदिप दिवेला तर काजलने आयेशाला दिला पराभवाचा धक्का

मुंबई : रोटरी क्लब ऑफ मुंबई पार्लेश्वर आयोजित छत्रपती शिवाजी महाराज स्मारक जुहू यांच्या सहकार्याने तसेच उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत तिसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या अंतिम फेरीत माजी राष्ट्रीय विजेत्या मुंबईच्या संदीप देवरूखकरने विश्व् विजेत्या संदीप दिवेला २५-३, २०-१९ असे सरळ दोन सेटमध्ये पराभूत करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आणि विजेतेपदासह रोख रुपये २५ हजारांचे इनाम व चषक मिळविला. तर महिलांच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या माजी राष्ट्रीय विजेत्या काजल कुमारीने अपेक्षेप्रमाणे मुंबईच्या ऐशा साजिद खानला २०-१९, २५-१ असे सहज चीत करत विजेतेपद पटकाविले. काजललाही रोख रुपये २५ हजार व चषक देऊन गौरविण्यात आले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या पुरुषांच्या लढतीत माजी विश्व् विजेत्या मुंबईच्या प्रशांत मोरेने मुंबईच्याच माजी राष्ट्रीय विजेत्या योगेश धोंगडेवर २५-१३, २५-८ असा विजय मिळविला. तर महिला गटातील तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत रत्नागिरीच्या आकांक्षा कदमने मुंबईच्या आंतर राष्ट्रीय कॅरमपटू निलम घोडकेवर २५-१५, ११-२५ व २५-२ अशी मात केली.
विजेत्यांना छत्रपती शिवाजी स्मारक जुहू व प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे प्रमुख अरविंद प्रभू, रोटरी क्लब ऑफ मुंबई पार्लेश्वरचे अध्यक्ष राजेश शहा व उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे रिजनल हेड अखिलेश अय्यर यांच्या हस्ते रोख पारितोषिके व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव यतिन ठाकूर व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेचे सचिव इकबाल नबी उपस्थित होते. अरविंद प्रभू यांनी यापुढेही कॅरम या खेळाला व स्पर्धेला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तर बँकेच्या अखिलेश अय्यर यांनी यापुढेही या स्पर्धेला बँकेतर्फे मदत देण्यात येईल असे जाहीर केले.

 127 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.