एनएमपीएल: मीरा-भाईंदर लायन्स अजिंक्य

स्पर्धेतील सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटू परीक्षित वळसंगकर ठरला. जपजीत रंधवाने उत्कृष्ट फलंदाजीचा तर हेमंत बुचडेने उत्कृष्ट गोलंदाजीचा पुरस्कार मिळविला.

ठाणे : माझगाव क्रिकेट क्लब आयोजित पहिल्या नवी मुंबई प्रीमियर लीग-एनएमपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद मीरा-भाईंदर लायन्सने पटकाविले. दादोजी कोंडदेव स्टेडीयमवर शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात मीरा-भाईंदरने ठाणे टायगर्सचा ७ विकेटने चुरशीचा पराभव केला. स्पर्धेतील सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटू परीक्षित वळसंगकर ठरला. जपजीत रंधवाने उत्कृष्ट फलंदाजीचा तर हेमंत बुचडेने उत्कृष्ट गोलंदाजीचा पुरस्कार मिळविला.
मीरा-भाईंदर लायन्स विरुद्ध नाणेफेक जिंकून ठाणे टायगर्सने प्रथम फलंदाजी स्विकारली. सलामीवीर अखिल हेरवडकर (२४ चेंडूत २५ धावा) व परीक्षित वळसंगकर (३२ चेंडूत ३८ धावा) यांनी पहिल्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी करून ठाणे टायगर्सला दमदार सुरुवात करून दिली. त्यानंतर मात्र यासीन शेख (१७ धावांत ४ बळी) व अंकित चव्हाण (१५ धावांत ३ बळी) यांच्या फिरकी गोलंदाजीने ठराविक अंतराने विकेट घेत ठाणे टायगर्सचा डाव ८ बाद १३३ धावसंख्येवर थोपविला. श्रीराज घरतने (२७ चेंडूत नाबाद ३८ धावा) मधल्या फळीत छान फलंदाजी केली.
प्रत्युत्तरादाखल मीरा-भाईंदरचे सलामीवीर सृजन आठवले (१६ चेंडूत २३ धावा), ऋग्वेद मोरे (३७ चेंडूत ५३ धावा), अभिषेक श्रीवास्तव (३१ चेंडूत २१ धावा), एस. जैन (२५ चेंडूत नाबाद २१ धावा) यांनी दमदार फलंदाजी केली. परिणामी मीरा-भाईंदर लायन्सने शेवटच्या चेंडूवर ३ बाद १३७ अशी विजयी धावसंख्या रचून विजेतेपदाला गवसणी घातली. पारितोषिक वितरण समारंभ एमसीएचे उपाध्यक्ष संजय नाईक, सेक्रेटरी अजिंक्य नाईक, जॉइंट सेक्रेटरी दीपक पाटील, खजिनदार अरमान मलिक, अपेक्स कौन्सिल मेंबर अभय हडप, मंगेश साटम, प्रमोद यादव, एनएमपीएलचे चेअरमन शाह आलम शेख, प्रदीप कासलीवाल, भूपेंद्र सिन्हा, अनुज बन्सल, अभिजित घोष, विनोद भानुशाली, प्रवीण घेवारी, विरेन जेठवा, रोशन खान, सफिक पटेल आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

 142,741 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.