अजिंक्य रहाणेचा तो संघ ऑस्ट्रेलियाला कायम आठवेल

कोरोना कालखंडात झालेल्या भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अनेक पैलूंवर गौरव जोशींनी यावेळी प्रकाश टाकला.

ठाणे : जवळपास ३७ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणाऱ्या अजिंक्य रहाणेच्या भारतीय संघाला ऑस्ट्रेलियन क्रिकेटप्रेमी, समीक्षक कायम लक्षात ठेवतील असे प्रतिपादन ऑस्ट्रेलियास्थित क्रिकेट समीक्षक, समालोचक गौरव जोशी यांनी केले. आनंद भारती समाज आणि फ्रेंडशिप क्रिकेट क्लब आयोजित भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयावर आयोजित टॉक शो मध्ये बोलताना गौरव जोशी यांनी हे भाष्य केले.
कोरोना कालखंडात झालेल्या भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अनेक पैलूंवर गौरव जोशींनी यावेळी प्रकाश टाकला. भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या वेळीस सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्या नावांची ऑस्ट्रेलियन प्रसार माध्यमांत दखल घेतली जायची. पण सुरुवातीच्या मानहानीकारक पराभवानंतर भारतीय संघाने ज्या पद्धतीने खेळ करत कसोटी मालिका जिंकली. त्यामुळे यापुढे भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान अजिंक्य रहाणेच्या त्या भारतीय संघाचा कायम उल्लेख होत राहील. या दौऱ्यादरम्यान ऑस्ट्रेलियातील प्रत्येक राज्यातील वेगवेगळ्या कोरोना विलनीकरणाच्या नियमांमुळे वैतागलेले भारतीय खेळाडू, त्यात पहिल्या कसोटीतील लाजीरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांची उडवलेली त्रेधातिरपीट यापार्श्वभूमीवर संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी खेळाडूंचे उंचावलेले मनोधैर्य, त्यानंतर खेळाडूंची उंचावलेली कामगिरीचे गौरव जोशी यांनी रसाळ शैलीत विश्लेषण केले. क्रिकेटप्रेमींचा उस्फूर्त प्रतिसाद मिळालेल्या या टॉक शोची प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमाने आणखी रंगत वाढवली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आनंद भारती समाजाचे अध्यक्ष सुभाष मोरेकर यांनी गौरव जोशी यांचे स्वागत केले. कार्यवाह विवेक मोरेकर यांनी जोशी यांचा परिचय उपस्थितींना करून दिला.

 19,660 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.