एकविरा देवी संस्थानाच्या प्रशासकीय संरचनेत कोळी, आगरी समाजाला प्रतिनिधित्व मिळायलाच पाहिजे

अखिल भारतीय कोळी समाज – महाराष्ट्र शाखेची आग्रही मागणी

ठाणे : महाराष्ट्रातील तमाम कोळी, आगरी समाजाची कुलदेवता असणाऱ्या एकविरा देवी संस्थांनाच्या प्रशासकीय संरचनेत या दोन समाजाना प्रतिनिधित्व देण्याची मागणी अखिल भारतीय कोळी समाजाच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष केदार लखेपुरीया यांनी केली आहे.
सुमारे दोन ते तीन वर्षांचा प्रशासकीय कारभार संपुष्टात आणताना मुंबई उच्च न्यायालयाने कार्ला बेहेरगाव येथील एकविरा देवी संस्थानाची निवडणूक घ्यायचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एकविरा देवी संस्थांनाच्या विश्वस्त मंडळाच्या सात जागांकरता येत्या २२ फेब्रुवारी रोजी निवडणूक होत आहे. मात्र या निवडणूकितील पद संख्येचे स्वरूप पाहता या निवडणूक प्रक्रियेत आपल्यावर अन्याय झाली असल्याची भावना या दोन्ही समाजातील एकविरा देवी भक्तांच्यात तयार झाली आहे. कार्ला बेहेरगाव येथील एकविरा देवी संस्थानाला मिळणाऱ्या एकूण महसुलापैकी ८० ते ८५ टक्के महसूल हा या दोन समाजातील भक्तांकडून जमा होतो. असे असतानाही संस्थानाच्या प्रशासकीय व्यवस्थेत कुठलेच स्थान नसल्याने त्यांच्यात संतापाचे वातावरण तयार झाले आहे. या संतापाची दखल शासकीय पातळीवर घेतली जावी याकरता या दोन्ही समाजाच्या भक्तांची एक बैठक अखिल भारतीय कोळी समाज, महाराष्ट्र शाखेने ठाण्यात एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत अनेक भक्तांनी या अन्यायाबाबत चीड व्यक्त करत यासंदर्भात आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात बोलताना अखिल भारतीय कोळी समाज महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष केदार लखेपुरीया म्हणाले, एकविरा देवी कोळी आगरी समाजाची कुलदेवता आहे हे कोणी नाकारू शकत नाही. या दोन्ही समाजाचे नवजात शिशूचे जावळ, नवविवाहित दाम्पत्याकडून एकविरा देवीचे ओटीभरण आणि इतर कुलाचार होत असतात. नवरात्र, चैत्र महिन्यातील पालखी सोहळयात या दोन्ही समाजातील भक्त मोठया संख्येने सहभागी होत असतात. निवडणूक प्रक्रियेत या दोन्ही समाजाना कुठेच स्थान देण्यात आलेले नाही.शिवाय या निवडणूकित मतदार म्हणून सहभागी होण्यासाठी १०० रुपयांच्या बॉण्ड पेपरवर शपथपत्र देण्यास सांगितले आहे. या जाचक अटीमुळे आपला हक्क डावलला जात असल्याची भावना भक्तांमध्ये तयार झाली आहे. त्यामुळे शासनाने एकविरा देवी संस्थानाच्या प्रशासकीय व्यवस्थेत या दोन्ही समाजाला योग्य ते प्रतिनिधित्व द्यावे. निवडणूक प्रकियेतील दोन्ही समाजासाठी जाचक असणाऱ्या अटी त्वरित काढून टाकाव्यात.
ठाणे चेंदणी कोळीवाड्यातील साईबाबा मंदिराच्या सभागृहात झालेल्या या बैठकीला अखिल भारतीय कोळी समाजाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल नाखवा, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष आनंद कोळी, नवी मुंबईतील जेष्ठ समाजसेवक चंद्रकांत तथा चंदू पाटील, उरणचे राजाराम पाटील, जयेश अनंत तरे, मालिनी वरळीकर यांच्यासह ठाणे जिल्ह्यासह मुंबई, पालघर, रायगड, पुणे आदी जिल्ह्यातील एकविरा देवीचे भक्त मोठया संख्येने सहभागी झाले होते.

 56,423 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.