व्हॉलीबॉल स्पर्धेच्या माध्यमातून दिवंगत मित्राला वाहिली आदरांजली
ठाणे : यजमान मस्टागं क्लबने गुडमॉर्निंग व्हॉलीबॉल क्लबचा सरळ दोन गेममध्ये पराभव करत दिवंगत व्हॉलीबॉलपटू धवल अहेर याला आदरांजली वाहण्यासाठी आयोजित केलेल्या दोन दिवसीय ठाणे जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
उपांत्य फेरीत सनसनाटी विजय मिळवणाऱ्या गुडमॉर्निंग व्हॉलीबॉल क्लबकडून अंतिम लढतीतही तशाच खेळाची अपेक्षा होती. पण निर्णायक लढतीत त्यांना त्याची पुनरावृत्ती करता आली नाही. पहिल्या गेमध्ये गुडमॉर्निंग व्हॉलीबॉल क्लबने चांगली लढत दिल्यामुळे मस्टागं संघाने २६ -२४ अशा नाममात्र फरकाने पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये मात्र मस्टागं संघाने प्रतिस्पर्ध्यांना डोके वर काढू देण्याची संधी न देता २५-११ अशा फरकाने गेम आणि सामनाही आपल्या खिशात घातला. त्याआधी उपांत्य फेरीच्या लढतीत गुडमॉर्निंग व्हॉलीबॉल क्लबने रंगतदार लढतीत टायटन्स क्लबवर २४-२६, २५-१८, १५-२६ अशी सरशी मिळवली होती. तर मस्टागं संघाने ऍचीव्हर्स संघाचा २५-२०, २५-११ असा सरळ पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळवले होते.
अव्वल दर्जाचा व्हॉलीबॉलपटू असलेल्या धवलचे ऐन उमेदीत अपघाती निधन झाले होते. त्याला श्रद्धांजली वाहण्याकरता धर्मवीर क्रीडा संकुलात खेळवण्यात आलेल्या स्पर्धेत जिल्ह्यातील आठ आघाडीच्या संघांना प्रवेश देण्यात आला होता. या स्पर्धेच्या आयोजनाचा सर्व आर्थिक भार त्याच्या मित्रांनी उचलला होता. विशेष म्हणजे ठाणे जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेच्या पंचांनीही दोन दिवस विनामूल्य आपली सेवा दिली. या स्पर्धेच्या निमित्ताने चांगल्या स्थितीतील जुने कपडे दान करण्याचे आवाहन धवलच्या मित्रांनी केले होते. त्यालाही नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला
4,115 total views, 2 views today