भारत पेट्रोलियम, मध्य रेल्वेची दिमाखदार सलामी

स्वामी समर्थ क्रीडा मंडळाची विशेष व्यावसायिक राजाभाऊ देसाई स्मृतीचषक कबड्डी स्पर्धा

मुंबई : स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या विशेष व्यावसायिक राजाभाऊ देसाई स्मृतीचषक कबड्डी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी रिशांक देवाडिगा, अस्लम इनामदार, पंकज मोहिते यांच्या वेगवान चढायांचा खेळ कबड्डीप्रेमींना पाहायला मिळाला. तगड्या खेळाडूंचा समावेश असलेल्या भारत पेट्रोलियम, आयएसपीएल (युवा पलटन) आणि मध्य रेल्वे या संघांनी आपल्या प्रतिस्पर्धी संघांचा धुव्वा उडवित दिमाखदार सलामी दिली.
इंडियन ऑईल, एलआयसी आणि सारस्वत बँकेच्या सहकार्यामुळे आयोजित कबड्डीतील अस्सल व्यावसायिक संघांच्या झुंजीच्या उद्घाटनाला शिवसेना नेते दिवाकर रावते, खासदार विनायक राऊत, माजी खासदार अनंत गीते, आमदार सचिन अहिर, अजय चौधरी, मनीषा कायंदे आणि विभागप्रमुख महेश सावंत उपस्थित होते. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी एकतर्फी पण जोरदार खेळ पाहायला मिळाला. रिशांक देवाडिगा (११ गुण) आणि आकाश रुडालेच्या (९ गुण) सुसाट चढायांनी न्यू इंडियाची बचावफळी अक्षरशा खिळखिळी केली. या दोघांच्या चढाया इतक्या तुफानी होत्या की त्यांनी मध्यांतरापूर्वीच दोन लोण चढवत ३२-६ अशी विजयी आघाडी घेतली. न्यू इंडियाच्या चढाईपटूंना भारत पेट्रोलियमच्या बचावफळीलाही भेदता आले नाही. त्यामुळे हा एकतर्फी सामना भारत पेट्रोलियमने ४२-१२ असा सहज खिशात घातला.
मध्य रेल्वेने पंकज मोहिते आणि शुभम शिंदेच्या खेळाच्या जोरावर ठाणे महानगर पालिकेचा ३४-१९ असा पराभव केला. ठाणे पालिकेला पंकजच्या चढायांना अडकविण्यात यशच लाभले नाही. त्याने १० गुण तर शुभम शिंदे (६) आणि संदीप धुल (५) यांनी पकडींचे गुण मिळवित मध्य रेल्वेचा विजय सोप्पा केला. रेल्वेपुढे ठाणे पालिकेची गाडी चढाई आणि पकडीत पूर्णता अपयशी ठरली. परिणामता मध्ये रेल्वेने विजयी सलामी दिली.
इन्शुयरकोट स्पोर्टस् (आयएसपीएल) म्हणजेच युवा पलटनच्या अस्लम इनामदारच्या चढायांना रोखण्याची ताकद मुंबई पोर्ट ट्रस्टच्या (एमपीटी) एकाही खेळाडूंत दिसली नाही. अस्लमने १० तर मोहित गोयतने ५ गुण चढायांवर मिळवित आयएसपीएलचा विजय निश्चित केला. अलंकार पाटील (७) आणि अबीनेश नटराजन (४) यांच्या कडेकोट बंदोबस्तामुळे एमपीटीच्या खेळाडूंना गुण मिळविणे कठिण होऊन बसले. न्यू इंडियाच्या सौरव पार्टेने चांगल्या चढाया केल्या, पण त्याच्या चढायांचा एमपीटीला काहीही फायदा झाला नाही. त्यामुळे आयएसपीएलने एमपीटीचा ४९-२० असा फडशा पाडला.

 125 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.