हुक्का पार्लरकडे वळण्यापेक्षा तरुणांनी गड संवर्धनाकडे वळावे

शिवनेरी-रायगड शिवरथ यात्रेच्या समारोप प्रसंगी आमदार संजय केळकर यांचे आवाहन.

ठाणे : हुक्का पार्लर आणि बार संस्कृतीकडे वळण्यापेक्षा तरुणांनी गड-किल्ले संवर्धनाकडे वळावे असे आवाहन करत आमदार संजय केळकर यांनी शिवनेरी-रायगड शिवरथ यात्रेत सामील झालेल्या तरुणांचे कौतुक केले.
पुण्यातील शिवनेरी ते कोकणातील रायगड किल्ला अशी शिवरथ यात्रा मंगळवारी पूर्ण झाली. सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या यात्रेचा समारोप रायगडावर झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सह्याद्री प्रतिष्ठानचे राज्य कार्याध्यक्ष तथा आमदार संजय केळकर उपस्थित होते.
सह्याद्री प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या यात्रेत राज्यातील अनेक शिवप्रेमी संस्था आणि संघटनांचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. रायगडावर या यात्रेचा समारोप करण्यात आला. आमदार संजय केळकर यांच्या हस्ते शिवमूर्तीचा जलाभिषेक आणि पूजन करण्यात आले. त्यानंतर शेकडो शिवप्रेमींना उद्देशून केळकर यांनी मार्गदर्शन केले. ‘शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या राज्यातील शेकडो गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्याची गरज आहे. आधुनिक काळात बऱ्यापैकी तरुण मंडळी शिवकालीन इतिहासापासून दूर होऊ लागली आहेत. बार आणि हुक्का पार्लर संस्कृतीपासून दूर नेण्यासाठी मी चळवळ सुरू केली आहे. या चळवळीला चांगले यश येत आहे. या तरुणांनी गड-किल्ले संवर्धनाकडे वळावे’ असे आवाहन आमदार केळकर यांनी केले.
सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे यांच्या नेतृत्वाखाली देशात प्रथमच पालखी सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्याला यंदा १३ वर्षे पूर्ण झाली आहेत. या समारोपास रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांचे जल व स्वराज्यातील गड किल्यांवरील जलाने महाराजांच्या पादुका व उत्सवमूर्तीस महाभिषेक केला जातो. या यात्रेत
विविध संघटना जोडल्या जातात.
किल्ले शिवनेरीपासून ही शिवरथयात्रा सुरु होते. कटाक्षाने शिस्त पाळली जाते. सर्व विभागाच्या परवानग्या घेतल्या जातात. या पाच दिवसांत शिवरथ यात्रा विविध गांवातून जात असताना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. जंगी ढोल-ताश्याच्या गजरात, लेझिमच्या तालात पालखीचे गावोगावी स्वागत होते.
शिवकालिन युद्ध प्रात्यक्षिके, सामाजिक प्रबोधनपर व्याख्याने आयोजित केली जातात. छत्रपती शिवरायांचा इतिहास, गड-किल्ल्यांचे महत्व सांगितले जाते. तरुणांमध्ये गडसंवर्धनाची चळवळ रुजवली जाते.

 23,842 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.