बुधवारपासून स्वामी समर्थच्या व्यावसायिक कबड्डीचा आवाज


बलाढ्य १२ संघ एकमेकांशी भिडणार
मुंबई : एकापेक्षा एक कबड्डीपटू… शेरास सव्वाशेर असे तगडे संघ… कबड्डीचा आवाज वाढवणारा दमदार सोहळा… एकेका गुणासाठी चढाई- पकडींची होणारी ठस्सन… संघांना लक्षाधिश करणारे मान आणि सन्मान… कबड्डीपटू,कबड्डीप्रेमी आणि कबड्डी संघटकांना प्रेमात पाडणारे दिमाखदार आयोजन… सारेच काही एका मॅटवर पाहण्याची रोमहर्षक संधी कबड्डीप्रेमींना लाभणार आहे ती प्रभादेवीच्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या कबड्डी स्पर्धेत. येत्या ८ ते ११ फेब्रूवारीदरम्यान प्रभादेवीच्या चवन्नी गल्लीत उभारलेल्या दिलीप परब क्रीडानगरीत राजाभाऊ देसाई स्मृतीचषकासाठी विशेष व्यावसायिक पुरूष गट कबड्डीचा जोरदार संघर्ष अनुभवायला मिळेल.
कबड्डीत धन येण्यापूर्वी कबड्डीपटू आणि कबड्डी संघांना मान आणि सन्मान मिळवून देणार्‍या दिमाखदार स्पर्धांचे आयोजन करून प्रभादेवीच्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाने आपला एक वेगळाच ठसा उमटवला आहे. ८० वर्षांच्या कबड्डीसाठी नेहमीच सक्षम आणि समर्थ असलेल्या या मंडळाने विशेष व्यावसायिक स्पर्धेचे आयोजन करताना भारत पेट्रोलियम, इन्शुअरकोट स्पोर्टस् (युवा पलटन), मध्य रेल्वे, युनियन बँक, मुंबई महानगर पालिका, ठाणे महानगर पालिका, बँक ऑफ बडोदा, हिंदुजा हॉस्पिटल, न्यू इंडिया अशुरन्स अशा बलाढ्य संघांचा ‘दम’दार खेळ पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
या स्पर्धेचे वैशिष्ट्यं म्हणजे आपल्या जोरदार चढाया- पकडींनी कबड्डी चाहत्यांना आपल्या प्रेमात पाडणारे भारत पेट्रोलियमचे रिशांक देवाडिगा, गिरीश इरनाक, निलेश शिंदे, विशाल माने, आयएसपीएलचे अस्लम इनामदार, आकाश शिंदे, मोहित गोयत, युनियन बँकेचे सुयोग गायकर, आदित्य शिंदे, बँक ऑफ बडोदाचे प्रणय राणे, किरण मगर, नितीन देशमुख हे कबड्डीचे सुपरस्टार प्रभादेवीच्या मॅटवर आपला सुसाट आणि भन्नाट खेळ करताना दिसतील.
कबड्डीचे ग्लॅमर वाढेल असे आयोजन करताना मंडळाने विजेत्या संघाला लक्षाधिश करणार असल्याचे जाहीर केले आहे. उपविजेता संघालाही पाऊणलाख आणि चषक दिला जाणार आहे. एवढेच नव्हे तर उपांत्य सामन्यात पराभूत झालेले संघही पावलाख रुपयांची कमाई करणार असल्याची माहिती मंडळाचे प्रमुख कार्यवाह महेश सावंत यांनी दिली. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूही सोनसाखळी जिंकेल तर चढाई आणि पकडवीरालाही सोन्याची भेटवस्तू दिली जाणार आहे.
स्पर्धेत एकंदर १२ बलाढ्य संघ खेळणार असून तीन-तीन संघांचे चार गट खेळविले जातील. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी एकमेकांशी भिडतील. स्पर्धा अधिक रंजक आणि थरारक व्हावी म्हणून एकाच मॅटवर खेळविली जाणार असून प्रत्येक दिवशी पाच सामने खेळविले जाणार असल्याची माहिती मंडळाचे क्रीडाप्रमुख रवी शिंदे यांनी दिली.
राजाभाऊ देसाई चषक स्पर्धेची गटवारी
अ गट: इन्शुअरकोट स्पोर्ट्स प्रा. लि. (आयएसपीएल), न्यू इंडिया अशुरेंस, हिंदुजा हॉस्पिटल.
ब गट: भारत पेट्रोलियम, मुंबई महानगरपालिका, त्रिमूर्ती इंटरप्राईजेस
क गट: बँक ऑफ बडोदा, मुंबई पोर्ट ट्रस्ट, युनियन बँक
ड गट: मिडलाईन फाऊंडेशन, मध्य रेल्वे, ठाणे महानगरपालिका.

 150 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.