युवा फलटण, युनियन बँक, रुपाली ज्वेलर्स, महिंद्र, मुंबई कस्टम, मध्य रेल्वे, एअर इंडिया, बृहन्मुंबई महानगर पालिका बाद फेरीत दाखल. 

ओम् ज्ञानदीप क्रीडा मंडळ रौप्यमहोत्सवी “पुरुष व्यावसायिक गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा-२०२३”

मुंबई :  युवा फलटण, युनियन बँक, रुपाली ज्वेलर्स, महिंद्र, मुंबई कस्टम, मध्य रेल्वे, एअर इंडिया, बृहन्मुंबई महानगर पालिका यांनी ओम् ज्ञानदीप मंडळाने आपल्या #रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त# आयोजित केलेल्या व्यावसायिक पुरुष गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. मिडलाईन व एच.ए. एल.ने पहिल्याच दिवशी आपला बाद फेरीतील प्रवेश निश्र्चित केला होता. एअर इंडिया विरुद्ध मिडलाईन व मुंबई कस्टम विरुद्ध बृहन्मुंबई महानगर पालिका हे उपउपांत्यपूर्व फेरीचे सामने प्रथम खेळविले जातील. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीचे सामने खेळविले जातील.
मुंबईतील आदर्शनगर स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावरील स्वर्गीय प्रभाकर(दादा) अमृते क्रीडानगरीतील मॅटवर झालेल्या सामन्यात आजच्या दुसऱ्या दिवशी क गटात मुंबई कस्टमला पुण्याच्या पिंपरी-चिंचवड चॅलेंजरने २२-२२असे बरोबरीत रोखले. मध्यांतराला कस्टमकडे १३-०७ अशी आघाडी होती. सुशांत साईल, आनंद पाटील, ऋतुराज कोरवी कस्टमकडून, तर अभि गावडे, आशिष वसावे, पवन वरांडे पुण्याकडून उत्तम खेळले. याच गटात नंतर झालेल्या सामन्यात कस्टमने महिंद्राला १७-१७ असे बरोबरीत रोखत बाद फेरीतील आपला प्रवेश निश्र्चित केला. महिंद्र गटविजेते म्हणून बाद फेरीत दाखल झाले. 
मध्य रेल्वे विरुद्ध एअर इंडिया हा ड गटातील सामना अत्यंत चुरशीने खेळला गेला. त्यात मध्यरेल्वेने ३३-३१ अशी बाजी मारली. सुरुवातीपासून बरोबरीत सुरू असलेल्या सामन्यात विश्रांतीला एअर इंडियाने १४-१२ अशी आघाडी घेतली होती. विश्रांतीनंतर दुसऱ्याच मिनिटाला एअर इंडियाने शुभम शिंदेंची पकड करीत १७-१२ अशी आघाडी वाढावीली. ही आघाडी काही काळ टिकली. रेल्वेच्या अजिंक्य पवारने एअर इंडियाचे शिलकी ३गडी टिपत लोण देत २६-२३अशी रेल्वेकडे आघाडी आणली. शेवटची ५मिनिटे पुकारली तेव्हा २९-२८ अशी रेल्वेकडे आघाडी होती. २मिनिटे पुकारली तेव्हा पुन्हा ३०-३० अशी बरोबरी होती. शेवटी रेल्वेने २गुणांनी बाजी मारली. प्रो-कबड्डी स्टार खेळाडूंचा भरणा असणाऱ्या रेल्वेला काल नवोदित पालघरने झुंजविले तर आज एकट्या विकास काळेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या नवोदित खेळाडूंने रेल्वेच्या तोंडचे पाणी पळविले. विनोद अत्याळकर, अजिंक्य पवार, शुभम शिंदे, अमिर धुमाळ रेल्वेकडून, तर आकाश कदम, अक्षय सूर्यवंशी, राज नाटेकर, विकास काळे एअर इंडियाकडून उत्कृष्ट खेळले. उशीरा झालेल्या सामन्यात एअर इंडियाने आकाश कदम, राज आचार्य, विकास काळे यांच्या चतुरस्त्र खेळाच्या बळावर प्रोऑलिमियाला ४०-१२असे सहज नमवित बाद फेरी गाठली.
मुंबई महानगर पालिकेने ई गटात रिझर्व्ह बँकेला ४१-३२असे पराभूत करीत बाद फेरीत प्रवेश केला. सुरुवातीपासून उत्कृष्ट खेळ करीत बँकेने आपल्याकडे आघाडी राखली होती. पहिल्या सत्रात १३-११अशी बँकेकडे आघाडी होती. उत्तरार्धात एक लोण देत ती आणखी वाढविली. पण शेवटच्या ७ मिनिटात चमत्कार घडला. पालिकेच्या जावेद पठाणने ३ गडी टिपत बॅँकेवर लोण देत २४-२४ अशी बरोबरी साधली. पुन्हा काही मिनिटाच्या फरकाने ३गडी टिपत दुसरा लोण देत ३५-२५ अशी आघाडी वाढविली. शेवटी ९गुणांनी पालिकेने विजय साकारत बाद फेरी गाठली. जावेदला या विजयात आशिष यादव, सोमनाथ बेडके यांच्या चढाई-पकडीची उत्कृष्ट साथ लाभली. बँकेच्या जयेशा यादव, ओम जांभळे, रुपेश साळुंखे यांचा खेळ शेवटच्या काही मिनिटात फिका पडला. युवा फलटणने अ गटात ठाणे महानगर पालिकेला ३०-१३असे नमवित या गटात प्रथम स्थान मिळविले. मोहित गोयत, विशाल नम, संकेत सावंत यांच्या चढाई-पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. युनियन बँकेने ब गटात रुपाली ज्वेलर्सला ५९-२१ असे पराभूत करीत बाद फेरी गाठली. ओमकार मोरे, परेश हरड, शुभम दिडवाघ यांच्या चढाई-पकडीच्या खेळाने बँकेने हा विजय साकारला. पण यानंतर झालेल्या सामन्यात रुपाली ज्वेलर्सने मध्य रेल्वे माटुंगा विभागाचा ३५-१८ असा पराभव करीत दुसरे स्थान मिळवीत बाद फेरी गाठली. सय्यद, रफिक काळे यांच्या अष्टपैलू खेळाला या विजयाचे श्रेय जाते.

 134 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.