मिडलाईन, मध्य रेल्वे, युनियन बँक, महिंद्र, युवा फलटण यांची विजयी सलामी.

ओम् ज्ञानदीप क्रीडा मंडळ रौप्यमहोत्सवी “पुरुष व्यावसायिक गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा-२०२३”

  मुंबई : मिडलाईन फौंडेशन, मध्य रेल्वे, युनियन बँक, महिंद्र, युवा फलटण यांनी ओम् ज्ञानदीप मंडळाने आपल्या “रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त” आयोजित पुरुष व्यावसायिक गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. एच.ए.एल.ला मात्र संमिश्र यश मिळाले. वरळी-आदर्श नगर येथील वरळी स्पोर्ट्स क्लबच्या “स्वर्गीय प्रभाकर(दादा) अमृते क्रीडानगरीतील मॅटवर झालेल्या उदघाटनिय सामन्यात रायगडच्या मिडलाईनने ई गटात बृहन्मुंबई महानगर पालिकेला ४०-२७ असे नमवित विजयी सलामी दिली. दोन्ही डावात १-१लोण देणाऱ्या मिडलाईनने विश्रांतीला २०-१३ अशी आघाडी घेतली होती. रात्री उशीरा झालेल्या दुसऱ्या सामन्यात मिडलाईनने रिझर्व्ह बँकेला ७४-३० असे धुवून काढत दुसऱ्या विजयासह आरामात बाद फेरी गाठली. पूर्वार्धात २, तर उत्तरार्धात ३ लोण देत मिडलाईनने गुणांचा पाऊस पाडत पाऊण शतकाजवळ मजल मारली. प्रफुल्ल झावरे, नितीन धनकड यांच्या झंजावाती चढाया आणि सागर जगताप, सुग्रीव पुरी यांच्या भक्कम बचावाला या दोन्ही विजयाचे श्रेय जाते. मुंबई पालिकेकडून रोशन वैती, जावेद पठाण, तर बँकेकडून जयेश यादव, रुपेश साळुंखे यांनी बऱ्यापैकी लढत दिली.
मध्य रेल्वेने ड गटात पालघरच्या प्रो-ऑलिमिया ३०-१८ असे नमवित पहिल्या साखळी विजयाची नोंद केली. प्रो-कबड्डी खेळाडूंचा भरणा असणाऱ्या रेल्वेला पूर्वार्धात नवोदित प्रोऑलिमियाने चांगलेच झुंजवले. पूर्वार्धात त्यांनी ४ अव्वल पकडी करून सामन्याची रंगत वाढविली. त्यातील दोन पकडी या अजिंक्य पवारच्या होत्या. बलवीर सिंग, रोहित पार्टे, सूरज बनसोडे रेल्वेच्या विजयाचे शिल्पकार ठरले. प्रोऑलिमियाकडून यश नरवणकर, जय वर्मा, अभिनव सिंग यांनी कडवी लढत दिली. युनियन बँकेने ब गटात मध्य रेल्वे माटुंगा विभाग संघाचा ३१-०७ असा पाडाव केला. विश्रांतीपर्यंत २लोण देत २०-०१ अशी भक्कम आघाडी घेणाऱ्या बँकेच्या आक्रमणाला थोपण्यास रेल्वेकडे उत्तर नव्हते. मिक सिंग, भरत करंगुटकर यांच्या चढाया व प्रतीक बेलमारेचा बचाव यामुळे बँकेने हा विजय साकारला. महिंद्राने चुरशीने खेळला गेलेल्या क गटात पुण्याच्या पिंपरी-चिंचवड चॅलेंजर्सचा प्रतिकार ४४-३३ असा मोडून काढला. पहिल्या सत्रात २लोण देत २८-१७ अशी आघाडी घेणाऱ्या महिंद्राने दुसऱ्या सत्रात सावध खेळ करीत विजय साकारला. तेजस पाटील, समीर ढोकळे, ओमकार जाधव, ओमकार एनपुरे महिंद्राचा विजयाचे शिल्पकार ठरले. अभि गावडे,गौरव तापकीर यांनी दुसऱ्या सत्रात पिंपरी-चिंचवड काढून कडवी लढत दिली.
युवा फलटणने अ गटात नाशिकच्या एच.ए.एल. वर ५७-१९ अशी सहज मात केली. पूर्वार्धात ३ आणि उत्तरार्धात २लोण देत युवा फलटणने गुणांचे अर्धशतक पार केले. आकाश शिंदे, मोनू गोयत यांच्या धारदार चढाया त्याला संकेत सावंत, रणेश्वर यांची मिळालेली पकडीची भकम साथ यामुळे हा विजय शक्य झाला. एच.ए.एल. चे ओमकार पोकळे, सकीब सय्यद चमकले. याच गटात एच.ए. एल.ने ठाणे महानगर पालिकेवर ३५-३० असा विजय मिळवीत बाद फेरी गाठण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या. विश्रांतीला १३-१०अशी आघाडी विजयी संघाकडे होती. गणेश बागुल, अक्षय पवार, ओमकार पोकळे एच.ए.एल.कडून, तर राजू कथोरे, आशिष शिंदे, मनोज बोन्द्रे ठाणे महानगर पालिकेकडून उत्कृष्ट खेळले. या स्पर्धेचे उदघाटन आशिष चेंबूरकर (विभाग प्रमुख), हरीश वरळीकर  (उपविभाग प्रमुख), विश्वास मोरे (प्रमुख कार्यवाह  मुंबई शहर कबड्डी असोसिएशन), दीपक कुडकर  (समाजसेवक), महेश सावंत (विभाग प्रमुख), अभिषेक गुप्ता (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), सुधाकर घाग  (स्पर्धा निरीक्षक) यांच्या उपस्थितीत पार पडला.

 141 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.