सुवर्ण चढाईत जे.एस.डब्ल्यू.ने जिंकले सलग चौथे जेतेपद

बँक ऑफ बडोदा शहरी विभागात, तर पश्र्चिम रेल्वे महिला विभागात विजेते.महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आयोजित औद्योगिक व व्यावसायिक कामगारांसाठी पुरुष(शहर) व पुरुष(ग्रामीण), तर महिलांसाठी खुली राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा-२०२३.

मुंबई : रायगडच्या जे.एस. डब्ल्यू. ने महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने आयोजित केलेल्या व्यावसायिक पुरुष ग्रामीण विभागात “सुवर्ण चढाईच्या” डावात विजेतेपद मिळविले. मुंबईच्या पश्र्चिम रेल्वेने महिला विभागात, तर बँक ऑफ बडोदाने व्यावसायिक पुरुष शहरी विभागाचे जेतेपद पटकाविले. ग्रामीण विभागात जे.एस.डब्ल्यू.चा अदिल पाटील, महिला विभागात सोनाली शिंगटे, तर शहरी विभागात बँक ऑफ बडोदाचा प्रणव राणे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. प्रभादेवी रेल्वे स्थानकाजवळील कामगार कल्याण मंडळाच्या हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन क्रीडांगणावर झालेल्या ग्रामीण विभागाच्या अंतिम सामन्यात जे.एस.डब्ल्यू. ने “सुवर्ण चढाईत” क्रांती अग्रणीचा ३७-३६ असा निसटता पराभव करीत #कामगार कल्याण चषक# व रोख रु.पन्नास हजार(₹५०,०००/-) आपल्या खात्यात जमा केले. त्यांचे हे  सलग चौथे विजेतेपद, तर या स्पर्धेतील हे ६वे जेतेपद ठरले.  उपविजेत्या क्रांती अग्रणीला चषक व रोख रु.पस्तीस हजार(₹३५,०००/-)वर समाधान मानुन घ्यावे लागले.  मध्यांतराला १६-१५ अशी नाममात्र आघाडी घेणाऱ्या क्रांती अग्रणीला पूर्ण डावात जे.एस.डब्ल्यू.ने ३०-३० असे बरोबरीत रोखले. त्यानंतर ५-५ चढाईच्या डावात देखील दोन्ही संघाची ६-६ अशी बरोबरी झाली. कबड्डीच्या नियमानुसार सामन्याचा निकाल ठरविण्याकरिता “सुवर्ण चढाई” देण्यात आली. त्याकरिता पुन्हा नाणेफेक करण्यात येऊन ती जे.एस.डब्ल्यू. ने जिंकली. शेवटी श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या सामन्यात जे.एस.डब्ल्यू.च्या चढाईपट्टूने गडी टिपत विजयाची मोहर आपल्या बाजूने उमटविली. अनिकेत कोठेकर, अदिल पाटील, संदेश पाटील, किशोर म्हात्रे यांच्या झंजावाती खेळाने  रायगडकरांनी हा विजय साकारला. संतोष हिप्परकर, वैभव वाघमोडे, अजय भगडम, अनिकेत जंगम यांनी क्रांती अग्रणीकडून शेवटच्या क्षणापर्यंत शर्थीची लढत दिली. परंतु विजयाने त्यांना हुलकावणी दिली.
महिलांच्या अंतिम सामन्यात पश्र्चिम रेल्वेने बँक ऑफ बडोदाला २९-२७ असे चकवित “कामगार कल्याण चषक” व रोख रु.पन्नास हजार(₹५०,०००/-)आपल्या नावे केले. प्रथमच या स्पर्धेत खेळणाऱ्या रेल्वेने पदार्पणातच हे यश मिळविले. उपविजेत्या बँकेला चषक व रोख रु. पस्तीस हजार(₹३५,०००/-)वर संतुष्ट व्हावे लागले. सुरुवातीपासून चुरशीने खेळलेल्या या सामन्यात सुरुवातीला काही काळ बँकेने आघाडी घेतली होती. पण ११व्या मिनिटाला रेल्वेने ११-११अशी बरोबरी साधली. १४व्या मिनिटाला रेल्वेने बँकेच्या शुभदा खोतची पकड करीत लोण देत १८-१४अशी आघाडी घेतली. येथून रेल्वेने मागे वळून पाहिले नाही. विश्रांतीला १८-१६अशी रेल्वेकडे आघाडी होती. सोनाली शिंगोटे, पूजा किणी यांच्या धारदार चढाया, त्याला संजता पाल, रक्षा नारकर यांची मिळालेली पकडीची भक्कम साथ यामुळे हा विजय शक्य झाला. बँकेकडून पूजा यादव, शुभदा खोत, साधना विश्वकर्मा, पौर्णिमा जेधे यांनी शेवटच्या क्षणापर्यंत कडवी लढत दिली.  या अगोदर झालेल्या उपांत्य सामन्यात प.रेल्वेने शिवशक्तीला-४४-३२ असे, तर बँक ऑफ बडोदाने अनिकेत मंडळाला २७-२३असे पराभूत करीत अंतिम फेरी गाठली होती. उपांत्य उपविजयी दोन्ही संघाना प्रत्येकी चषक व रोख रु.वीस हजार(₹२०,०००) देऊन गौरविण्यात आले. बँकेची पूजा यादव व अनिकेत मंडळाची सिद्धी चाळके स्पर्धेतील अनुक्रमे उत्कृष्ट चढाई व पकडीच्या खेळाडू ठरल्या.
शहरी पुरुषांच्या अंतिम सामन्यात बँक ऑफ बडोदाने न्यू इंडिया इन्शुरन्सचा प्रतिकार ३७-२४असा मोडून काढत “कामगार कल्याण चषक” व रोख रु.पन्नास हजार(₹५०,०००) पटकाविले. उपविजेत्या न्यू इंडियाला चषक व रोख रु.पस्तीस हजार देऊन सन्मानित करण्यात आले. पहिला गुण घेत न्यू इंडियाने सुरुवात झोकात केली होती. पण १०व्या मिनिटाला लोण देत बँकेने १२-०७ अशी आघाडी घेतली. पहिल्या सत्रात बँकेकडे १७-१२ अशी आघाडी होती. शेवटची ५ मिनिटे पुकारली तेव्हा २७-१९ अशी बँकेकडे आघाडी होती. प्रणव राणे, नितीन देशमुख यांच्या चढाया त्याला अनिल इनामदार, शार्दूल पाटील यांची मिळलेली क्षेत्ररक्षणाची साथ यामुळे बँकेने हा विजय साकारला. सागर सुर्वे, अक्षय मकवाना, केतन काळवनकर, अभिषेक नर यांनी न्यू इंडियाकडून उत्तम प्रतिकार केला. या अगोदर झालेल्या उपांत्य सामन्यात बँक ऑफ बडोदाने हिंदुजा रुग्णालयाला ४०-२३ असे, तर न्यू इंडियाने मुंबई बंदरला ३४-१८ असे नमवित अंतिम फेरीत प्रवेश केला होता. उपांत्य उपविजयी दोन्ही संघांना प्रत्येकी चषक व रोख रु. वीस हजार(₹२०,०००/-) प्रदान करण्यात आले. न्यू इंडियाचा अक्षय मकवाना आणि हिंदुजा रुग्णालयाचा तुषार घुले स्पर्धेतील अनुक्रमे उत्कृष्ट चढाई व पकडीचे खेळाडू ठरले.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, कामगार विभागाचे उपसचिव दादासाहेब खताळ, कल्याण आयुक्त रविराज इळवे, ओएनजीसीचे महाप्रबंधक विवेक झिने, मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाहक  विश्वास मोरे, सुप्रसिद्ध कबड्डीपटू रिशांक देवडिगा, स्पर्धा निरीक्षक सदानंद माजलकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

 185 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.