महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आयोजित औधोगिक व व्यावसायिक कामगारांसाठी पुरुष(शहर) व पुरुष(ग्रामीण), तर महिलांसाठी खुली राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा-२०२३.
मुंबई : रायगडचा जे.एस.डब्ल्यू. संघ आणि सांगलीचा क्रांती अग्रणी यांनी कामगार कल्याण मंडळ आयोजित व्यावसायिक ग्रामीण विभागात अंतिम फेरीत धडक दिली. अनिकेत मंडळ-खेड-रत्नागिरी, शिवशक्ती मंडळ, पश्र्चिम रेल्वे, बँक ऑफ बडोदा(तिन्ही मुंबई) यांनी महिला विभागात, तर बँक ऑफ बडोदा, मुंबई बंदर, पी.डी. हिंदुजा रुग्णालय व न्यू इंडिया इन्शुरन्स(सर्व मुंबई) यांनी व्यावसायिक पुरुषांच्या शहरी विभागात उपांत्य फेरी गाठली. प्रभादेवी रेल्वे स्थानकाजवळील कामगार कल्याण मंडळाच्या हुतात्मा बाबू गेनू क्रीडांगणार सुरु असलेल्या पुरुषांच्या ग्रामीण विभागाच्या उपांत्य फेरीत अत्यंत चुरशीने खेळला गेलेल्या सामन्यात सांगलीच्या क्रांती अग्रणी संघाने अलिबागच्या प्रीमिअर कंपनीला ३६-३५ असे चकवीत अंतिम फेरी गाठली. पहिल्या सत्रात वैभव वाघमोडे, निरंजन पाटील, अजय मगदम यांच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर २१-१० अशी भक्कम आघाडी घेतली होती. पण दुसऱ्या सत्रात त्यांना विजयासाठी प्रीमियरने चांगलेच झुंजविले. प्रीमिअरच्या राज जंगम, राहुल भोईर यांनी दुसऱ्या सत्रात टॉप गिअर टाकत भराभर गुण घेत सांगलीकारांच्या तोंडास फेस आणला. पण प्रिमीअरच्या खेळाडूची झालेली अव्वल पकड त्यांना पराभवाच्या गर्तेत घेऊन गेली.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात गतविजेत्या रायगडच्या जे.एस.डब्ल्यू. ने रेमंडचा ३१-२४ असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली. किशोर म्हात्रे, संदीप पाटील यांच्या चढाई-पकडीच्या खेळाच्या बळावर पूर्वार्धातच लोण देत २२-०९ अशी आघाडी रायगडकरांनी घेतली होती. उत्तरार्धात रेमंडच्या यशवंत माकळकर, आकाश ठाकर यांनी आपला खेळ उंचावत सामन्यात रंगात आणली. पण विजयापासून ते दूरच राहिले. महिलांच्या उपांत्यपूर्व सामन्यात खेड-रत्नागिरीच्या अनिकेत मंडळाने धुळ्याच्या शिवशक्तीला ४१-१७ असे नमवित उपांत्य फेरी गाठली. सिद्धी चाळके, तसमीन बुरोंडकर अनिकेतकडून, तर पूजा कदम शिवशक्तीकडून उत्कृष्ट खेळल्या. मुंबईच्या शिवशक्तीने उपनगरच्या स्वराज्य स्पोर्ट्सचा ३८-१५ असा पाडाव करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. रिया मडकईकर, प्राची भादवणकर, अंकिता पाटील यांच्या अष्टपैलू खेळाने हा विजय सोपा गेला. पश्र्चिम रेल्वेने पूजा किणी, रक्षा नारकर यांच्या चढाई-पकडीच्या जोशपूर्ण खेळाने अमर हिंद मंडळाला २९-११ असे चीत करीत आपली आगेकूच सुरू ठेवली. अमर हिंदची श्रद्धा कदमने एकाकी लढत दिली. शेवटचा उपांत्यपूर्व सामना चुरशीने खेळला गेला. त्यात बँक ऑफ बडोदाने जे. जे. रुग्णालयाचा प्रतिकार ३८-३१ असा मोडून काढत आगेकूच केली. मध्यांतराला १८-१६ अशी बँकेकडे आघाडी होती. पूजा यादव, पौर्णिमा जेधे यांच्या संयमी खेळाला बँकेच्या विजयाचे श्रेय जाते. जे.जे.ची हर्षा शेट्टी एकाकी लढली.
व्यावसायिक पुरुष शहर विभागाच्या उपांत्यपूर्व सामन्यात बँक ऑफ बडोदाने रिझर्व्ह बँकेचे आव्हान ३६-२३ असे संपुष्टात आणत उपांत्य फेरी गाठली. प्रणव राणे, शार्दूल पाटील, साहिल राणे यांच्या चढाई-पकडीच्या उत्तम खेळाने बडोदा बँकेने दोन्ही डावात १-१ लोण देत हा विजय साकारला. रिझर्व्ह बँकेच्या जयेश यादव, मिलिंद पवार यांनी सामन्यातील चुरस कायम राखण्याचा प्रयत्न केला. पण संघाला विजयी करण्यात ते कमी पडले. मुंबई बंदरने सौरभ पार्टे, कृष्णा शिंदे, कैलास आंब्रे यांच्या खेळाच्या बळावर भारत पेट्रोलियमला ३७-२९ असे नमवित आपली विजयी घोडदौड कायम राखली. निखिल पवार, प्रसाद ठेले यांनी पेट्रोलियमकडून कडवी लढत दिली. पी.डी. हिंदुजा रुग्णालयाने शुभम चौगुले, संतोष वारकरी यांच्या सर्वांगसुंदर खेळाच्या जोरावर माटुंगा मध्य रेल्वेचा २२-१० असा सहज पाडाव केला. शेवटच्या उपांत्यपूर्व सामन्यात न्यू इंडिया इन्शुरन्सने माझगांव डॉकवर ४२-१६ अशी मात केली ती राज चव्हाण, आकाश चव्हाण, सिद्धेश तटकरे यांच्या चढाई-पकडीच्या चतुरस्त्र खेळामुळे. माझगांव डॉकचा कुलदीप भोसले चमकला.
२४ जानेवारीचे मानकरी.
पुरुष शहर विभाग :- रुपेश साळुंखे-रिझर्व्ह बँक. महिला विभाग:- श्रद्धा कदम-अमर हिंद मंडळ. पुरुष ग्रामीण विभाग:- अनिकेत मिटके-अशोक इंजिनिअरिंग.
२५ जानेवारीचे मानकरी.
पुरुष शहर विभाग:– सूरज दुधाने-माटुंगा रेल्वे वर्कशॉप. महिला विभाग :- नेहा वर्मा- माऊली स्पोर्ट्स. पुरुष ग्रामीण विभाग:- सलमान शेख- कॉपर कॉर्पोरेशन.
.
50 total views, 1 views today