आंतरराष्ट्रीय महिला हॉकीपटू नीना असईकर-राणे यांचे निधन

केंद्र सरकारने त्यांच्या कामगिरीची दखल न घेतल्याची खंत त्यांना आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राहिली. आंतरराष्ट्रीय पातळीवर दमदार कामगिरी करूनही त्यांना नेहमीच अर्जुन पुरस्कारार्थींच्या यादीतून डावलण्यात आले. परिणामता त्यांना कधीही अर्जुन पुरस्कार मिळू शकला नाही.

मुंबई : भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रसिद्ध गोलरक्षक आणि १९७४ आणि १९७९ सालच्या हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत प्रतिनिधीत्व करणार्‍या नीना असईकर-राणे यांचे दीर्घ आजाराने आज सायंकाळी निधन झाले. त्या ७५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती सुनील राणे आणि दोन मुले असा परिवार आहे.
मुंबईच्या लुसिटॅनियन्स क्लबकडून तब्बल दहावर्षे खेळत आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेल्या नीना राणे यांनी कॉलजेमध्ये असताना खालसाचेही प्रतिनिधीत्व केले होते. १९७४ साली पॅरिस येथे झालेल्या महिलांच्या वर्ल्डकप हॉकीमध्ये नीना असईकर भारताकडून खेळल्या होत्या आणि भारताने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. तसेच १९७५ साली चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या सहाराष्ट्रीय बेगम रसूल आंतरराष्ट्रीय करंडकात असईकर यांनी भारताला अजिंक्यपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा होता. ही त्यांच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली होती.
नीना असईकर या सेंट्रल बँकेत अधिकारी पदावर सेवेत होत्या. तेथेच त्यांचे अधिकारी असलेल्या सुनील राणे यांच्याशी विवाह झाला. त्या काहीकाळ बँकेतूनही राष्ट्रीय स्तरावर हॉकी खेळल्या. तसेच बँक क्रीडा मंडळाच्याही सक्रिय सदस्या होत्या. तेव्हा त्या अनेक कबड्डी-हॉकी स्पर्धांच्या आयोजनातही सहभागी होत असत. त्याचप्रमाणे त्यांनी पत्रकारितेचेही शिक्षण पूर्ण करीत स्पोर्टस् वीक या साप्ताहिकातही लिखाण केले.
अर्जुन पुरस्कार न मिळाल्याची खंत
नीना असईकर हॉकीत भारतासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर दहा वर्षे खेळल्या. त्यांच्या कामगिरीची दखल महाराष्ट्राने घेत त्यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले. पण केंद्र सरकारने त्यांच्या कामगिरीची दखल न घेतल्याची खंत त्यांना आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राहिली. आंतरराष्ट्रीय पातळीवर दमदार कामगिरी करूनही त्यांना नेहमीच अर्जुन पुरस्कारार्थींच्या यादीतून डावलण्यात आले. परिणामता त्यांना कधीही अर्जुन पुरस्कार मिळू शकला नाही.
संजाण येथे उभारले मतिमंदांसाठी वसतीगृह
नीना राणे यांची मुलगी मतिमंद असल्यामुळे त्यांनी या मुलांच्या वेदना जवळून पाहिल्या होत्या. त्यामुळे त्यांनी गुजरात राज्यात पारशी धर्मियांचे पवित्र स्थान असलेल्या संजाण गावी मतिमंदाचे वसतीगृह उभारले होते. ते वसतीगृह सुरळीत चालावे आणि तेथे असलेल्या मतिमंद मुलांना सर्व सोयी उपलब्ध व्हाव्यात म्हणून त्यांनी अनेक कंपन्यांकडून निधीही गोळा केला होता. या वसतीगृहावर त्या जातीने लक्ष देत होत्या.

 284 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.