भारत पेट्रोलियम, शिवशक्तीला जेतेपद

पांचगणी व्यायाम मंडळाची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

पांचगणी : पांचगणी व्यायाम मंडळाच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे दोन्ही अंतिम सामने अखेरच्या चढाईपर्यंत रंगतदार ठरले. मुंबईच्या भारत पेट्रोलियमने मुंबईच्याच बँक ऑफ बडोदाला २९-२७ अशी धूळ चारून निमंत्रितांच्या व्यावसायिक पुरुष गटाचे जेतेपदाचा गंगूबाई शिंदे स्मृतिचषक आणि ७५ हजार रुपये रोख बक्षीस पटकावले. महिलांमध्ये मुंबईच्या शिवशक्ती महिला संघाने पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाला ३२-२९ असे हरवून गंगूबाई शिंदे स्मृतिचषक आणि ४५ हजार रुपये रोख बक्षिसाचा मान मिळवला. शिवशक्तीचे हे हंगामातील पाचवे विजेतेपद ठरले.
पुरुषांच्या अंतिम सामन्यात चौथ्या मिनिटालाच भारत पेट्रोलियमने बँक ऑफ बडोदावर लोण चढूवन ९-२ अशी आघाडी घेतली, तेव्हा हा सामना एकतर्फी होईल असे अंदाज बांधले जात होते. बँक ऑफ बडोदाला हे मान्य नव्हते. १२व्या मिनिटाला त्यांनी लोणची परतफेड करीत १०-१० अशी बरोबरी साधली.  तरी पण पहिल्या सत्राअखेरीस भारत पेट्रोलियमने १५-१२ अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या सत्रात भारत पेट्रोलियमने आपली आघाडी २५-१७ अशी वाढवली. पण बँक ऑफ बडोदाच्या नितीन देशमुखने एका चढाईत चार गुण मिळवत २१-२५ अशी आघाडी कमी करीत सामन्यात रंगत निर्माण केली. पुढे पाच मिनिटे बाकी असताना बँक ऑफ बडोदाने दुसरा लोण चढवत हे अंतर २५-२७ अशी कमी केली. सामना संपायला दीड मिनिटाचा अवधी असताना २७-२७ अशी बरोबरी झाली होती. पण अक्षय सोनीने प्रतिस्पर्धी संघाचा बचाव भेदून चढाईत गुण घेत एका गुणाची आघाडी भारत पेट्रोलियमला मिळवून दिली. मग गिरीश इरनाकने एकट्याने विशाल देहयष्टीचा चढाईपटू नितीनला मैदानाबाहेर रेटून पकडीचा एक गुण मिळवत भारत पेट्रोलियमला २९-२७ अशी निर्णायक आघाडी मिळवून दिली. दोन्ही संघांच्या उर्वरित एकेक चढाया निष्फळ ठरल्या आणि याच गुणसंख्येवर भारत पेट्रोलियमने विजयाचा जल्लोष साजरा केला. हुकमी पकडींच्या बळावर भारत पेट्रोलियमच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला उजवा कोपरारक्षक निलेश शिंदे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मानकरी ठरला. बँक ऑफ बडोदाच्या प्रणय राणेने या स्पर्धेत लक्षवेधी खेळ करीत चाहत्यांची मने जिंकली.
महिलांच्या अंतिम सामन्यात राजमाता जिजाऊ संघाने पाचव्या मिनिटाला शिवशक्तीवर लोण चढवत १०-५ अशी आघाडी मिळवली. हे द्वंद्व मध्यांतराला १८-१४ असे राजमाता जिजाऊच्या बाजूने होते. पण दुसऱ्या सत्राच्या तिसऱ्याच मिनिटाला शिवशक्तीने लोण परतवत सामन्यावर पकड निर्माण केली. दोन्ही संघांची बचावफळी उत्तम कार्य करीत होती. याशिवाय राजमाता जिजाऊकडून सलोनी गजमल आणि मंदिरा कोमकर तर शिवशक्तीकडून पूजा यादव आणि रेखा सावंत यांच्या चढायांमुळे सामन्यात रंगत आली. अखेरच्या काही मिनिटांत ती आणखी वाढली. सलोनीची साधना विश्वकर्माने पकड केल्यामुळे राजमाता संघ पिछाडीवर पडणार अशी चिन्हे असतानाच मंदिरा कोमकरने दोन सलग चढायांमध्ये बोनससह एकेक गुण घेत राजमाताला २९-२९ अशी बरोबरी साधून दिली. पण शेवटून दुसऱ्या चढाईत पूजाने तीन गुणांची कमाई करीत सामना ३२-२८ असा शिवशक्तीकडे झुकवला. मग शिवशक्तीने राजमाता संघाच्या कोमलला अखेरच्या चढाईत एक गुणापर्यंत मर्यादित ठेवले आणि सामना जिंकला. पूजा यादव स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरली.
त्याआधी, पुरुषांच्या उपांत्य लढतींमध्ये भारत पेट्रोलियमने मुंबई बंदर संघाला २८-१८ असे नामोहरम केले, तर रंगतदार उपांत्य सामन्यात बँक ऑफ बडोदाने पुण्याच्या इन्कम टॅक्स संघाचा ३२-२९ असा पराभव केला. महिला गटात राजमाता जिजाऊ  संघाने डॉ. शिरोडकर संघाचा ४१-२७ असा, तर शिवशक्ती महिला संघाने स्वराज्य संघाला ३७-१६ असे हरवले.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आमदार मकरंद (आबा) पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी अ‍ॅड. गणेश गोळे, माजी नगराध्यक्ष नानासाहेब कासुर्डे, जावली सहकारी बँकचे चेअरमन विक्रम भिलारे, युवानेते प्रकाश गोळे, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे उपस्थित होते.

 167 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.