भारत पेट्रोलियम आणि बँक ऑफ बडोदा यांच्यात अंतिम लढत

पांचगणी व्यायाम मंडळ आयोजित पुरुष व्यावसायिक गट आणि महिला गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

पांचगणी : भारत पेट्रोलियम आणि बँक ऑफ बडोदा या मुंबईच्या दोन बलाढ्य संघांमध्ये पांचगणी व्यायाम मंडळातर्फे आयोजित केलेल्या पुरुष व्यावसायिक गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेची अंतिम झुंज रंगणार आहे. भारत पेट्रोलियमने एकतर्फी उपांत्य सामन्यात मुंबई बंदर संघाला २८-१८ असे नामोहरम केले, तर रंगतदार उपांत्य सामन्यात बँक ऑफ बडोदाने पुण्याच्या इन्कम टॅक्स संघाचा ३२-२९ असा पराभव केला.
पहिल्या उपांत्य सामन्यात भारत पेट्रोलियमने सुरुवातीपासून सामन्यावर नियंत्रण मिळवत पहिल्या सत्रात १८-८ अशी घेतलेली आघाडी दुसऱ्या सत्रातसुद्धा राखली आणि आरामात सामना जिंकला. भारत पेट्रोलियमकडून रिशांक देवाडीगा आणि आकाश साने यांनी चौफेर चढाया केल्या, तर आक्रम शेख आणि गिरीश इरनाक यांनी दिमाखदार पकडी केल्या. मुंबई बंदरचा कुणाल शिंदे छान खेळला.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात पहिल्या पाच मिनिटात लोण पडल्यामुळे बँक ऑफ बडोदा इन्कम टॅक्सविरुद्ध ५-११ असा पिछाडीवर पडला होता. अगदी मध्यंतरालाही इन्कम टॅक्सकडे १४-१२ अशी आघाडी होती. पण उत्तरार्धात दुसऱ्या आणि १४व्या मिनिटाला असे दोन लोण बँक ऑफ बडोदाने चढवून सामन्यातील रंगत वाढवली आणि अखेरीस सामना खिशात घातला. प्रणय राणे आणि नितीन देशमुखच्या चढाया तर गणेश महाजनच्या पकडीनी बँक ऑफ बडोदाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. इन्कम टॅक्सचे अक्षय जाधव आणि निलेश साळुंखे छान खेळले.
राजमाता जिजाऊ, शिवशक्ती अंतिम फेरीत
स्थानिक महिला गटाचे दोन्ही उपांत्य सामने एकतर्फी झाले. पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाने मुंबईच्या डॉ. शिरोडकर संघाचा ४१-२७ असा, तर मुंबईच्या शिरोडकर महिला संघाने मुंबई उपनगरच्या स्वराज्य संघाला ३७-१६ असे हरवून अंतिम फेरी गाठली.
पहिल्या उपांत्य सामन्यात पहिले पाच मिनिटे शिरोडकर संघाने राजमाता संघाला चांगली लढत दिली. पण स्वाती गजमलने एका चढाईत तीन गुण मिळवत राजमाताला आघाडी मिळवून दिली. मग एका लोणच्या बळावर राजमाताने मध्यंतराला २४-१६ अशी आघाडी घेतली. मग उत्तरार्धातही राजमाता संघाचे वर्चस्व दिसून आले. राजामाता संघाच्या विजयात स्वाती गजमलच्या चढायांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तिला सायली केरीपाळेच्या चढाया आणि प्रियांका मांगलेकरच्या पकडींनी उत्तम साथ दिली. शिरोडकर संघाकडून मेघा कदम आणि कशिश पाटील यांनी शर्थीने प्रयत्न केले.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात शिवशक्ती संघाने पहिल्या पाच मिनिटांत स्वराज्य संघावर लोण चढवून १५-५ अशी आघाडी घेतली. मग मध्यंतराला २०-७ अशी आघाडी मिळवली. दुसऱ्या सत्रातही शिवशक्ती संघाने हे वर्चस्व कायम राखले. साधना विश्वकर्मा आणि रेखा सावंतच्या चौफेर चढाया तसेच अक्षता पाटील आणि रक्षा नारकरच्या दमदार पकडींमुळे शिवशक्ती संघाला विजय मिळाला. स्वराज्य संघाकडून मिशीका पुजारी आणि ऋतिका घाडीगावकर छान खेळल्या.

 185 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.