शिवशक्ती, राजमाता जिजाऊ संघांची विजयी सलामी

पांचगणी राज्यस्तरीय पुरुष व्यावसायिक आणि महिला कबड्डी स्पर्धा

पांचगणी : शिवशक्ती महिला संघ आणि राजमाता जिजाऊ या संघांनी पांचगणी व्यायाम मंडळातर्फे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय स्थानिक महिला कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी नोंदवली.
अ-गटात रायगडच्या कर्नाळा स्पोर्ट्स क्लबने मुंबईच्या शिवशक्ती संघाला चांगलेच झुंजवले. रश्मी पाटीलने एका चढाईत तीन गुणांची कमाई केल्याने कर्नाळा संघाने सुरुवातीला सामन्यावर नियंत्रण मिळवले. नंतर साधना विश्वकर्माने एका चढाईत चार गुण मिळवल्याने सामन्यातील रंगत वाढली. १०व्या मिनिटाला कर्नाळा संघाने लोण चढवला आणि १६-११ अशी आघाडी मिळवली. पण शिवशक्तीने गुणांचा ही आघाडी कमी केली. मध्यंतराला कर्नाळा संघाकडे १७-१६ अशी आघाडी होती. त्यानंतर दुसऱ्या सत्रातही सामन्यातील रंगत टिकून होती. पण अखेरच्या दोन मिनिटांत शिवशक्तीने लोण चढवून सामना ३२-२९ असा जिंकला. शिवशक्तीकडून पूजा यादवने दमदार चढाया केल्या, तिला पौर्णिमा जेधे आणि साधनाच्या लक्षवेधी पकडींची सुरेख साथ लाभली. कर्नाळा संघाच्या रचना म्हात्रे आणि पायल निगडेने चढायांचा तर रश्मीने पकडींचा छान खेळ केला.
ब-गटात पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाने साताराच्या जय हनुमान कला – क्रीडा व संस्कृती मंडळाचा ५८-१३ असा धुव्वा उडवताना पाच लोण चढवले. मंदिरा कोमकर आणि ऋतुजा निगडे राजमाता जिजाऊ संघाच्या विजयाच्या शिल्पकार ठरल्या.
बँक ऑफ बडोदा बाद फेरीत
पुरुष व्यावसायिक विभागातील अ-गटात विशाल देहयष्टीच्या नितीन देशमुखच्या हुकमी चढायांमुळे बँक ऑफ बडोदाने पिंपरी – चिंचवड चॅलेंजर्स संघाला ४२-३२ असे नमोहरम केले. त्यामुळे या गटातून भारत पेट्रोलियम आणि बँक ऑफ बडोदाने बाद फेरी गाठली आहेत, तर पिंपरी – चिंचवड चॅलेंजर्सचे आव्हान संपुष्टात आले आहे. बँक ऑफ बडोदाच्या विजयात प्रणय राणे आणि राम अदोगळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पिंपरी – चिंचवड चॅलेंजर्सच्या अभी गावडेने चांगला खेळ केला.
ब-गटात मुंबईच्या महिंद्रा अँड महिंद्रा संघाने मुंबईच्याच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया संघावर ३८-३५ असा निसटता विजय मिळवला. सिद्धेश पाटीलच्या चौफेर चढाया आणि मिलिंद पवार, रुपेश साळुंखेच्या पकडी या बळावर रिझर्व्ह बँकेने पहिल्या सत्रात २४-१४ अशी आघाडी घेतली होती. पण दुसऱ्या सत्रात सौरभ राऊत, आकाश गायकवाड यांच्या दिमाखदार चढायांना ओंकार येनगेकरेच्या पकडींची उत्तम साथ लाभल्याने महिंद्राने खेळ उंचावत सामना जिंकला.
ड-गटात मुंबईच्या न्यू इंडिया इन्शुरन्स संघाने पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समिती संघावर ३०-२३ असा विजय मिळवला. न्यू इंडियाकडून समर सुर्वे आणि राज चव्हाण यांनी अनुक्रमे दमदार चढाया आणि पकडींचा खेळ केला. कृषी उत्पन्न संघकडून प्रवीण बाबरने पराभव टाळण्यासाठी शर्थीने प्रयत्न केला. दोन पराभवांमुळे कृषी उत्पन्न संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे.

 166 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.