तत्कालीन आयुक्तांनीच दिले होते त्या बांधकामांवर कारवाई  न करण्याचे आदेश

.

कॉंग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचा आरोप

ठाणे : महापालिका हद्दीत सुरु असलेल्या अनाधिकृत बांधकामांच्या मुद्यावरुन ठाणे शहर कॉंग्रेस पुन्हा आक्रमक झाली आहे. लोकायुक्तांनी अनाधिकृत बांधकामाबाबत आदेश दिले असतांनाही महापालिकेकडून त्यावर अद्याप कोणतीच कारवाई झालेली नसल्याचा आरोप ठाणे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. तर तत्कालीन आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांनी कळव्यातील अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करु नये असे आदेश दिले असल्याचा गौप्यस्फोटही केला आहे.सहाय्यक आयुक्तांनी दिलेल्या खुलासामध्ये तसे नमुद करण्यात आले आहे. त्यामुळेच सहाय्यक आयुक्तांची देखील चौकशी थांबली असल्याचेही त्यांनी सांगितले.
             ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे,प्रवक्ते राहुल पिंगळे आणि अॅड बाबासाहेब भुजबळ आदी उपस्थित होते,शहरात सुरु असलेल्या अनाधिकृत बांधकामाबाबत लोकआयुक्तांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर लोकायुक्तांनी अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास सांगितले होते. तर महापालिकेच्या तत्कालीन आयुक्तांनी अनाधिकृत बांधकामांना नागरी सुविधा पुरविल्या जाणार नसल्याचे आश्वासनही दिले होते. मात्र त्यांनीच या आदेशाला केराची टोपली दाखविली असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला आहे. अनाधिकृत बांधकामांमुळे नागरी सुविधांवर ताण वाढत आहे, केवळ मतांचा जोगवा मिळविण्यासाठी काही ठिकाणी लोकप्रतिनिधी व इतर मोठे नेते या बांधकामांना राजाश्रय देत असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र त्यामुळे प्रामाणिकपणो कराचा भरणाऱ्या मुळ ठाणेकरांवर त्यामुळे अन्याय होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
  अनाधिकृत बांधकाम प्रकरणी महासभेत ठराव झाल्यानंतर आजी, माजी सहाय्यक आयुक्तांची चौकशी लावली गेली. त्यानुसार १४ सहाय्यक आयुक्तांची चौकशी लागली होती. त्यानुसार काहींनी अनाधिकृत बांधकामप्रकरणी स्पष्टीकरण दिले तर काहींनी दिलेले नाही. तर या कारवाईचा अहवाल आयुक्तांकडे पाठविला जाणार होता. परंतु हा अहवाल गुलदस्त्यात असून अद्याप त्यांच्यावर काहीच कारवाई झालेली नाही. असे असतांना आता चव्हाण यांनी तत्कालीन आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. अनाधिकृत बांधकाम प्रकरणी तत्कालीन सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे यांनी लेखी खुलासा देतांना कळव्यातील एका बांधकामावर कारवाई न करण्याचे आदेश आयुक्तांनीच दिले असल्याचे त्यात म्हंटले आहे. त्यामुळे ही चौकशीच थांबविण्यात आल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे. दुसरीकडे आता या अनाधिकृत बांधकामांच्या विरोधात पुन्हा लोकायुक्तांकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
घनकचरा विभागात कोटय़ावधींचा भ्रष्टाचार
ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागात कोटय़वधींची भ्रष्टाचार सुरु असल्याचा आरोपही यावेळी चव्हाण यांनी केला आहे. घनकचरा विभागात वर्तकनगर येथील हजेरीपेटीवर ५० कर्मचारी कामावर दाखविले जात आहेत. परंतु प्रत्यक्षात १५ कर्मचारी कामावर असून ३५ कर्मचारी गैरहजर असल्याचे पुरावे त्यांनी यावेळी दिले. १५ कर्मचारी असतांना पगार मात्र ५० कर्मचाऱ्यांचा काढला जात आहे. ठाणे शहरात ४३ हजेरीपेटी असून त्याठिकाणी देखील अशाच स्वरुपाचे काम सुरु असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. त्यामुळे महापालिकेला महिन्याला अडीच कोटींचे नुकसान सोसावे लागत आहेत, शिवाय २ कोटी ठेकेदाराला द्यावे लागत असल्याने त्यातून ४.५० कोटींचा येथे भ्रष्टाचार दरमहा होत असल्याचे त्यांनी सांगितले.
दुसरीकडे महापालिकेच्या माध्यमातून मेट्रीक टनावर कचरावर ट्रान्सपोटेशनचा खर्च केला जात आहे. मात्र महापालिकेकडे असलेले वजन काटेच सदोष असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे यातून देखील सुमारे २ कोटींचा खर्च चुकीच्या पध्दतीने होत असून याठिकाणी देखील ट्रान्सपोटेशनच्या नावाखाली भ्रष्टाचार सुरु आहे. तर शहरात जमा होणारा कचरा हा पहिला सीपी तलाव जवळ आणला जातो. त्यानंतर तो एकत्रित करुन दिवा येथील डम्पींगवर नेला जातो. परंतु कळवा, मुंब्रा हे भाग डम्पींग पासून जवळ असतांना तेथील कचरा देखील सीपी तलावावर आणल्याचा भास केला जात असून प्रत्यक्षात हा कचरा थेट डम्पींगवर नेला जात आहे. परंतु ठेकेदाराला मात्र दोनदा बिले काढली जात असल्याचा आरोपही यावेळी चव्हाण यांनी केला. त्यामुळे एकूणच घनकचऱ्यात सध्या महिनाकाठी सात ते आठ कोटींचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप त्यांनी केला असून या प्रकरणाची चौकशी करुन संबधींतावर कारवाई करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी असेही त्यांनी सांगितले.

 431 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.