रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत प्रा.संगीत रागी यांची भारतीयांना साद
ठाणे : जगात आज पाचव्या स्थानावर असलेल्या भारताने भाषा, ज्ञान, अध्यात्म, कला, धर्म या बाबतीत जगाला मोठा वारसा दिला आहे.तेव्हा,नविन भारताला सृजनाच्या दिशेने नेण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साह्य करूया. अशी भावनिक साद राजकिय विश्लेषक प्रा.संगीत रागी यांनी घातली. ठाण्यात आयोजित ३७ व्या रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेचे उद्धाटन सोमवारी प्रा.संगीत रागी यांच्या हस्ते सरस्वती क्रीडा संकुलाच्या मैदानात झाले. त्यावेळी “आझादी का अमृत महोत्सव” हे व्याख्यानमालेतील पहिले पुष्प त्यांनी गुंफले.
यावेळी व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर आणि सचिव शरद पुरोहीत व्यासपीठावर उपस्थित होते. तर, श्रोत्यांमध्ये मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू संजय देशमुख, माजी उपमहापौर सुभाष काळे, माजी नगरसेविका प्रतिभा मढवी, डॉ. राजेश मढवी, विद्याधर वैशंपायन, प्रा.किर्ती आगाशे आदी मान्यवर उपस्थित होते.
व्याख्यानात उपस्थितांना संबोधित करताना प्रा.रागी यांनी, प्राचीन ते अर्वाचीन भारतातील स्थिती उलगडताना अखंड भारताच्या नकाशाचा उल्लेख करून विविध दाखले दिले. ही भूमी देवदुतांच्या अवतारांची नसुन साक्षात देवांची भूमी आहे. पूर्वी भारताच्या सीमा कंधार, ब्रम्हदेशपर्यत जात होत्या. अशा जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक असलेल्या भारताला हजारो वर्षे जुना इतिहास आहे, अनेक साम्राज्ये, संस्थाने या भूमीत विकसित पावली व लयाला गेली. अनेक भाषा, अनेक प्रांत, अनेक रितीरिवाज असले तरी याच विविधतेत भारताची एकता सामावलेली आहे. भारताला प्राचीन धार्मिक व सांस्कृतिक परंपरा लाभली असुन गुरु – शिष्याच्या परंपरेने भारत विशाल बनला आहे. वेद, उपनिषदे व शास्त्रांमुळे भारत जगात श्रेष्ठ आहे. तरीही स्वातंत्र्यांच्या ७५ वर्षानंतर यावर विचार करण्याची गरज निर्माण झाली असल्याकडे प्रा. रागी यांनी लक्ष वेधले.
महर्षी अरविंद, रविंद्रनाथ टागोर, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या भारताविषयीचे योगदान स्पष्ट करून प्रा. रागी यांनी १९४७ ते २०१४ पर्यंतच्या भारतीय कालखंडाची परखड शब्दात मिमांसा केली.तर, हिंदुंना गहन चिंतनाची गरज असल्याचे सांगुन २०१४ नंतरच खऱ्या अर्थाने नव्या विचारांचा भारत घडत असल्याचे नमुद केले. युपीए काळात ९ व्या स्थानी असलेला भारत आज जगात ५ व्या स्थानी असुन या आठ वर्षात निर्यातीतही अव्वल बनला आहे. १९७१ च्या जनगणनेत ३ टक्के साक्षर होते आज ७४ टक्के साक्षर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांस्कृतिक, सामाजिक न्याय, स्वदेशीचा आग्रह आणि जागतीकीकरणात देशाला नवी दिशा दिली आहे. तेव्हा, नविन भारताला सृजनाच्या दिशेने नेण्यासाठी त्यांना साह्य करूया. अशी साद प्रा. रागी यांनी भारतीयांना घातली.
रसिक श्रोत्यांनी उचलुन धरलेली व्याख्यानमाला – आमदार केळकर
रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेचे हे ३७ वे वर्ष असुन आजचे हे २५३ वे व्याख्यान असल्याचे प्रास्तविकात नमुद करून आमदार संजय केळकर यांनी, त्यांच्या अध्यक्षतेखाली अखंडीत सुरु असलेल्या ह्या सांस्कृतिक चळवळीचा आढावा घेत अनेक आठवणी वृद्धींगत केल्या. पहिल्या व्याख्यानापासुन रसिक श्रोत्यांनी ही व्याख्यानमाला उचलुन धरली आहे.१९९४ साली माजी गव्हर्नर जगमोहन यांच्या व्याख्यानावेळी अचानक पाऊस बरसल्याने जागा बदलण्याची वेळ आली, तेव्हा सभागृहात व्याख्यान घ्यावे लागले.त्यालाही रसिकांची गर्दी उसळली, अक्षरशः जिन्याच्या पायऱ्यांवर बसुन अनेकांनी व्याख्यानाचा आस्वाद लुटला.त्या काळात कडाक्याच्या थंडीतही श्रोते शाल पांघरून व्याख्यानाला येत असत. अशा आठवणी आमदार केळकर यांनी जागवल्या.
3,017 total views, 1 views today