जिथे निष्ठा आहे तेथे ‘विष्ठा ‘ कशी आली ?

ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंतांची मुख्यमंत्र्यांवर ठाण्यात टीका

ठाणे : शिवसेनेला पहिली सत्ता ठाण्याने दिली. त्या ठाण्यात जिथे निष्ठा आहे, तिथे विष्ठा कशी आली ? असा सवाल करीत उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्र्यावर टिकास्त्र सोडले. दिशा ग्रुप,आधार सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन वर्षाचे औचित्य साधुन ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा शिवसेना उपशहर प्रमुख भास्कर बैरीशेट्टी यांनी शिवाई नगर येथे आयोजित केला होता. यावेळी शेकडो ज्येष्ठ नागरीक महिला व पुरुषाना ब्लँकेट वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे, माजी नगरसेवक नरेश मणेरा, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, रागिणी बैरीशेट्टी, सागर बैरीशेट्टी आदीसह स्थानिक शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्यात सत्तांतर होऊन शिवसेनेत दोन गट निर्माण झाले. ठाण्यातही अनेक लोकप्रतिनिधींनी शिंदे गटाची कास धरली असली तरी जनता जनार्दन आणि तमाम निष्ठावंत कार्यकर्ते आजही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आहेत.यातील शिवाईनगर परिसरातील माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी आणि त्यांचे पती भास्कर बैरीशेट्टी यांनी काही दिवसांपूर्वी ठाकरे गटात घरवापसी केली आहे. ठाण्याची शिवसेना आणि शिवसेनेचे ठाणे हे नाते आजही कायम राहील आणि भविष्यात देखील हे नाते घट्टच राहील. असा विश्वास यावेळी भास्कर बैरीशेट्टी यांनी यावेळी व्यक्त केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण अशी शिकवण दिलेल्या मार्गाने उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने समाजसेवेचा वसा आम्ही पुढे घेऊन जात असून याच आधारावर विभागातील ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेट वाटप करण्यात येत असल्याचे बैरीशेट्टी यांनी सांगीतले.
दरम्यान, यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटावर जोरदार टीका करीत समाचार घेतला. “एकवेळ लढावू नाही बनलात तरी चालेल, पण विकाऊ होऊ नका” ठाण्याचे धर्मवीर आनंद दिघे हे कधीच विकाऊ झाले नाही.ज्या ठाण्याने पहिली सत्ता शिवसेनेला दिली, जिथे निष्ठा होती त्या ठाण्यात ही विष्ठा कशी आली ? हा एकनाथ असुनी नाथ … अनाथ आहे. असे उद्गार काढत अरविंद सावंत यांनी मुखमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. याच कार्यक्रमात खासदार राजन विचारे यांनी देखील जुन्या आठवणी जाग्या करत बाळासाहेबांनी लावलेल्या शिवसेना या वटवृक्षाची काही बिनकामाची पाने गळाली असल्याची टीका करत फुटीर शिंदे गटाचा समाचार घेतला.

 13,007 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.