“सुवर्ण चढाईत” मुंबई शहर संघाची विजेतेपदाला गवसणी

मुंबई शहरचा पुरुष संघ ठरला “श्रीकृष्ण करंडकाचा” मानकरी. पुण्याच्या महिलांनी सलग पाचव्यांदा “पार्वतीबाई सांडव चषकावर” आपले नाव कोरले. ७०वी वरिष्ठ गट पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा-अहमदनगर- २०२२.

   अहमदनगर : मुंबई शहरच्या पुरुषांनी ७०व्या वरिष्ठ गट पुरुष महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत ” सुवर्ण चढाईत” जेतेपदाचा मुकुट पटकाविला. महिलांच्या लढतीत पुण्याने सलग पाचव्यांदा जेतेपदाची किमया साधली. मुंबई शहरला या स्पर्धेत संमिश्र यश मिळविता आले. अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी फेडरेशनच्या विद्यमाने नगरच्या वाडिया पार्क मैदानावरील मॅटवर झालेले दोन्ही सामने अत्यंत चुरशीने खेळले गेले. जवळपास दहा हजारपेक्षा जास्त कबड्डीरसिकांनी प्रत्यक्ष या सामन्याचा आनंद मनमुराद लुटला. पुरुषांच्या अंतिम सामन्यात मुंबई शहरने यजमान गतविजेते अहमदनगरचा “सुवर्ण चढाईत” ३२-३१ असा पराभव करीत ” श्रीकृष्ण करंडकावर” आपले नाव कोरले. मुंबईचे हे या स्पर्धेतील २२वे जेतेपद. याअगोदर २००५ साली जळगाव येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबईने पुण्याला पराभूत करीत विजेतेपद मिळविले होते.  गतवर्षी भिवंडी-ठाणे येथे झालेल्या या ६९व्या स्पर्धेत मुंबईला “सुवर्ण चढाईतच” नगरकडूनच पराभव पत्करावा लागला होता. त्याची परतफेड मुंबईने केली.
मुंबईने सुरुवात झोकात करीत मध्यांतराला १२-०८ अशी आघाडी घेतली होती. पण शेवटच्या काही मिनिटात नगरनें स्थानिक रसिकांच्या जोशपूर्ण पाठिंब्यावर सामन्याची रंगत वाढविली. सामना संपायला २मिनिटे असताना २गुणांची आघाडी मुंबईकडे होती. पण नगरनें एक पकड करीत व चढाईत गुण घेत २५-२५ अशी बरोबरी साधली. त्यामुळे ५-५ चढायांचा जादा डाव खेळविण्यात आला. यात चौथ्या चढाईत नगरनें पकड करीत व चढाईत गुण घेत आधाडी घेतली होती. पण मुंबईने पाचव्या चढाईत पकड करीत व गुण घेत ५-५ अशी बरोबरी साधली. त्यानंतर सामन्याच्या नियमाप्रमाणे “सुवर्ण चढाईचा” डाव खेळविण्यात आला. या करिता पुन्हा नाणेफेक करण्यात आली. यात गतवर्षाप्रमाणे नगरने बाजी मारली. गतवर्षी शंकर गदईने चढाई करीत अहमदनगरला पहिले विजेतेपद मिळवून दिले होते. पण यावेळी आदित्य शिंदेने चढाई केली. त्याने बोनस गुण मिळविला, पण त्याची पकड झाली. त्यामुळे पुन्हा दोन्ही संघाची ३१-३१ अशी बरोबरी झाली. हे नगरच्या पाठीराख्याना कळले नाही. त्यांनी नगर जिंकली म्हणून मैदानात एकच जल्लोष केला. पण पुन्हा एकदा बरोबरी झाल्यामुळे नियमाप्रमाणे मुंबईला चढाईची संधी देण्यात आली. क्षणाक्षणाला काळजाचा ठोका चुकविणाऱ्या या सामन्यात अखेर सुशांत साईलने पूर्ण विराम दिला. या चढाईत सुशांतने बोनस गुण घेत मुंबईच्या पारड्यात “श्रीकृष्ण करंडक” खेचून आणला. सुशांत साईल, अक्षय सोनी, प्रणय राणे यांच्या संयमी चढाया बरोबरच संकेत सावंत, हर्ष लाड, ओमकार मोरे यांच्या भक्कम बचावाला या विजयाचे श्रेय जाते. आदित्य शिंदे, सौरभ राऊत, शंकर गदई यांनी नगरला विजयी करण्याकरिता शेवटच्या क्षणापर्यंत निकराची लढत दिली.पण संघाला विजयी करण्यात त्यांना अपयश आले. निर्णायक चढाई आदित्य शिंदे ऐवजी शंकर गदईने केली असती तर निकाल कदाचित वेगळा लागला असता.
महिलांचा अंतिम सामना देखील चुरशीचा झाला. त्यात पुण्याने मुंबई शहरला ३०-२९ असे निसटते चकवीत सलग पाचव्यांदा “पार्वतीबाई सांडव” चषकावर आपले नाव कोरले. मुंबई शहरला मात्र सलग चौथ्यांदा उपविजेत्यापदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेतील पुण्याच्या महिलांचे हे २४वे जेतेपद. पुण्याने आक्रमक सुरुवात करीत पहिल्या डावात १८-११ अशी महत्वपूर्ण आघाडी घेतली. उत्तरार्धात ती वाढवीत नेली. सामना एकतर्फी होणार असे वाटत असतानाच सामन्यात अचानक सनसनाटी निर्माण झाली. मुंबईच्या मेघा कदम हिने एका चढाईत पुण्याचे ४ गडी टिपत सामन्यात चुरस निर्माण केली. यानंतर मुंबईने पुण्यावर लोण देत काही वेळातच २६-२६ अशी बरोबरी साधली. पण यातून सावरत पुण्याने एका गुणाने बाजी मारत सलग चौथ्यांदा मुंबईचे स्वप्न भंग केले. खऱ्या अर्थाने हा सामना आम्रपाली गलांडे विरुद्ध मुंबई असाच झाला. ती प्रत्येक चढाई गुण मिळविण्याच्या इराद्यानेच करीत होती. तिची एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपरारक्षकाला हाताने टिपण्याची कला लाजवाब होती. तिला पूजा शेलार, अंकिता जगताप यांची देखील मोलाची साथ लाभली. मुंबईकडून पूजा यादव, मेधा कदम, पौर्णिमा जेधे, श्रावणी घाडीगांवकर यांनी उत्तम बचाव करीत शेवटच्या क्षणाला शर्थीची लढत देत सामना आपल्याबाजूने झुकविण्याचा प्रयत्न केला. पण वेळ संपल्यामुळे त्यांना एका गुणाने माघार घ्यावी लागली. या सामन्यांचे बक्षीस वितरण मुंबईचे आमदार सुनील शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

 176 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.