महाराष्ट्राच्या मुलींचा सिक्कीमवर सहज विजय

४१ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खोखो स्पर्धा

बन्सबेरिया (पश्चिम बंगाल) : पश्चिम बंगालमधील बन्सबेरिया (जि. होगळी) येथे २६ ते ३० डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या ४१ व्या राष्ट्रीय कुमार-मुली खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने सिक्कीमचा सहज पराभव करत साखळी सामन्यातील पहिला विजय मिळवला.
बन्सीबेरी येथील खामरपारा सिशू संघ मैदानावर हे सामने सुरु आहेत. सकाळच्या सत्रात झालेल्या साखळी सामन्यात महाराष्ट्र मुलींच्या संघाने सिक्कीमचा १ डाव १८ गुणांनी (२३-५) असा धुव्वा उडवला. या सामन्यात दीपाली राठोड (४ मी. संरक्षण व ३ गुण), संपदा मोरे (३.३० मि.संरक्षण व २ गुण ), काजल शेख (३ मि. संरक्षण व ३ गुण ), प्रणाली काळे (२.३० मि. संरक्षण), कल्याणी कंक (१.३० मिनीट संरक्षण व ४ गुण), सोनाली पवार (२ मिनिटे संरक्षण व १ गुण) यांनी चांगला खेळ केला. पराभूत सिक्कीम संघातर्फे मारिया, मोरेशी यांनी चांगला खेळ केला.
मुलींच्या उर्वरित सामन्यात कर्नाटकने विदर्भचा (१८-११) असा ७ गुणांनी पराभव केला. तसेच आसामने दादरानगर हवेलीचा (२९-२) असा एक डाव २७ गुणांनी, मणिपूरने जम्मू काश्मीरचा (१७-६) असा एक डाव ११ गुणांनी, पोंडिचेरी ने चंदीगड चा (१३-२) असा एक डाव ११ गुणांनी पराभव केला.
कुमार गटात आसामने बिहारचा (२२-८) असा १ डाव १४ गुणांनी, केरळने दादरा नगर हवेलीचा (२३-६) असा एक डाव १७ गुणांनी, चंदीगडने त्रिपुराचा (१४-१३) एक गुण ६.२० मिनिटे राखून विजय मिळवला.

 177 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.