भारत पेट्रोलियम, मध्य रेल्वे विभाग, न्यू इंडिया एन्शुरन्स यांनी व्यावसायिक गटाच्या बाद फेरीत

राष्ट्रीय मिल मजदूर संघ “अमृत महोत्सवी वर्ष” राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष व स्थानिक महिला गट कबड्डी स्पर्धा-२०२२.

मुंबई : भारत पेट्रोलीयम, मध्य रेल्वे विभाग, न्यू इंडिया एन्शुरन्स यांनी राष्ट्रीय मिल मजदूर संघाने आपल्या “सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त” आयोजित केलेल्या व्यावसायिक पुरुष गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. महिला गटात शिवशक्ती-मुंबई शहर, ऋषी वाल्मिकी, शिवशक्ती-धुळे, यांनी बाद फेरीत धडक दिली. ना.म.जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखाना येथे सुरू असलेल्या पुरुषांच्या अ गटात संभाव्य विजेत्या भारत पेट्रोलीयमने सेंट्रल बँकेचा प्रतिकार ४२-२१ असा मोडून काढत ही किमया साधली. मध्यांतराला १९-१० अशी आघाडी घेणाऱ्या पेट्रोलीयमने उत्तरार्धात आपल्या खेळ अधिक गतिमान करीत हा विजय साकारला. अक्षय सोनी, प्रफुल्ल चव्हाण यांच्या आक्रमक चढाया, प्रो-कबड्डी स्टार रोहित राणाचा भक्कम बचाव या विजयात महत्वाचा ठरला. बँकेच्या जितेंद्र व निखिल या कदम बंधूंचा पूर्वार्धातील जोश उत्तरार्धात कमी पडला.
मध्य रेल्वे(विभाग) संघाने हिंदुजा रुग्णालयाचा २९-१८ असा पराभव करीत बाद फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला. स्वप्नील घाडगे, विष्णु धामणकर यांच्या उत्कृष्ट चढाया त्याला सिद्धेश जळगावकरची पकडीची मिळालेली उत्तम साथ यामुळे हा विजय शक्य झाला. हिंदुजाचा शुभम चौगुले चमकला. न्यू इंडिया एन्शुरन्सने अत्यंत चुरशीच्या सामन्यात पूर्वार्धातील  १०-१२अशा २गुणांच्या पिछाडीवरून युनियन बँकेचे आव्हान २२-१९ असे संपुष्टात आणले. या पराभवाने बँकेला साखळीतच गारद व्हावे लागले, तर न्यू इंडियाने बाद फेरी गाठली. राज व आकाश या चव्हाण बंधूंच्या चढाया त्याला नितीन घोगळेची पकडीची मिळालेली साथ या मुळे हे शक्य झाले. राकेश मोकल, मोहन पुजारी, रोहित सिंह यांचा पूर्वार्धातील जोश उत्तरार्धात थोडा कमी पडला. शेवटच्या साखळी सामन्यात मुंबई महानगर पालिकेने ठाणा महानगर पालिकेला ३५-३५ असे बरोबरीत रोखले. दोन्ही संघांनी बाद फेरी गाठली.
महिलांच्या अ गटात मुंबई शहराच्या शिवशक्तीने विश्वशांतीला ५३-१८असे पराभूत केले. पहिल्या सत्रात २लोण देत २५-०७ अशी आघाडी घेणाऱ्या शिवशक्तीने दुसऱ्या सत्रात देखील तोच जोश कायम राखत गुणांचे अर्धशतक पार केले. प्रतीक्षा तांडेल, दिव्या मडकईकर यांच्या जोशपूर्ण चढाया त्याला पौर्णिमा जेधे, साक्षी रहाटे यांची मिळालेली बचावाची भक्कम साथ त्यामुळे हा विजय साकारला. विश्वशांतीच्या भारती यादव, शीतल मेगडे यांचा खेळ या सामन्यात अगदीच फिका ठरला. 
महिलांच्या क गटात धुळ्याच्या शिवशक्तीने पूजा यादव, रक्षा नारकर यांच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर ऋषी वाल्मिकीला ४८-३४ असे पराभूत केले. पण याच गटात जिजामाता पोलीस संघाने सोनाली सुतार, सिद्धी वाफेलकर, आरती यादव यांच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर धुळ्याच्या शिवशक्तीला ३२-१९ असे नमवित गटात चुरस निर्माण केली. या गटात तीन संघाचे २-२असे समान साखळी गुण झाले. त्यामुळे बाद फेरी गाठणारे संघ ठरविण्याकरिता या संघाच्या गुणांतील फरक काढण्यात आला. ऋषी वाल्मिकी संघाच्या गुणांतील फरक+४, शिवशक्ती +१, तर जिजामाता पोलीस -५ असा आला. त्यामुळे ऋषी वाल्मिकी व शिवशक्तीने बाद फेरी गाठली.
बाद फेरी गाठणारे पुरुष संघ :- भारत पेट्रोलीयम, सेंट्रल बँक, बँक ऑफ बडोदा, मध्य रेल्वे(विभाग), मुंबई महानगर पालिका, ठाणे महानगर पालिका, न्यू इंडिया एन्शुरन्स, सी.जी. एस. टी.
महिला संघ : शिवशक्ती-मुंबई शहर, कुर्लाई स्पोर्ट्स, अमरहिंद, महात्मा गांधी स्पोर्ट्स, ऋषी वाल्मिकी, शिवशक्ती- धुळे, डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स, होतकरू.

 178 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.