दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनला विजेतेपद

अर्जुन मढवी स्मृती महिला टी ट्वेन्टी लीग क्रिकेट स्पर्धेत मागील दोन वर्षे दिलीप वेंगसरकर संघाला उपविजेतेपदावर मानावे लागले होते समाधान.

ठाणे : मागील दोन वर्षे हुलकावणी देत असलेले विजेतेपद अखेर दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन संघाने मिळवलेच. निर्णायक लढतीत दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन संघाने विजय क्रिकेट क्लबचा सात विकेट्सनी पराभव करत अर्जुन मढवी स्मृती महिला टी ट्वेन्टी लीग क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
डॉ. राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिएशन आणि दैवज्ञ क्रिकेट क्लब आयोजित स्पर्धेतील अंतिम लढतीत प्रथमच स्थान मिळवणारा आणि सलग दोन वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या पार्कोफिन क्रिकेट क्लबला उपांत्य फेरीत नमवणारा विजय क्रिकेट क्लब दोन वेळा उपविजयी ठरलेल्या दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन संघाला कशी लढत देतो याची उत्सुकता सगळ्यांना होती. सातत्याने अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या जान्हवी काटेने चांगली फलंदाजी करत विजय क्रिकेट क्लबला आश्वासक सुरुवात करुन दिली होती. पण २६ धावांवर खेळणारी जान्हवी संशयास्पदरित्या पायचित झाल्यावर विजय क्रिकेट क्लबच्या धावसंख्येला खिळ बसली. जयश्री भूतीया (२८) आणि रिया चौधरीने १४ धावा करत संघाला शतकी धावसंख्या उभारुन दिली. विजय क्रिकेट क्लबने २० षटकात ७ बाद १०४ धावांचे आव्हान प्रतिस्पर्ध्यांसमोर उभे केले. फातिमा जाफरने दोन, रेश्मा नायक आणि प्रकाशिका नाईकने प्रत्येकी एक विकेट मिळवली.
त्यानंतर आचल वाळंजूने नाबाद ३७ धावा करत संघाला विजयाचा दरवाजा उघडून दिला. सिमरन शेख (२१) आणि शाहीन अब्दुल्लाच्या १८ धावांच्या खेळीमुळे दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन संघाने १८ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर ३फलंदाजांच्या मोबदल्यात १०५ धावांनिशी विजयासह अर्जुन मढवी स्मृतीचषक जिंकला. सरस्वती जैस्वार, जान्हवी काटे आणि कोमल परबने प्रत्येकी एक विकेट मिळवली. अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचे पारितोषिक आचल वाळंजू देण्यात आले.
संक्षिप्त धावफलक –
विजय क्रिकेट क्लब : २० षटकात ७ बाद १०४ ( जान्हवी काटे २६, जयश्री भूतीया २८, रिया चौधरी १४, फातिमा जाफर ४-१९-२, रेश्मा नायक ४-२०-१,प्रकाशिका नाईक ४-१९-१) पराभुत विरुद्ध दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन : १७.३ षटकात ३ बाद १०५ ( आचल वाळजू नाबाद ३७, सिमरन शेख २१, शाहीन अब्दुल्ला १८, सरस्वती जैस्वार २-१२-१,जान्हवी काटे ४-१५-१, कोमल परब २-१४-१)
स्पर्धतील सर्वोत्तम खेळाडू : गोलंदाज – विधी मथुरिया ( दिलिप वेंगसरकर फाऊंडेशन).
क्षेत्ररक्षक – रिया चौधरी ( विजय क्रिकेट क्लब).
फलंदाज – मिताली म्हात्रे (व्हिक्टरी क्रिकेट क्लब).
अष्टपैलू – जान्हवी काटे (विजय क्रिकेट क्लब)
स्पर्धेत हॅट्ट्रिक साधणाऱ्या गोलंदाज – तनिशा धनावडे, मानसी बोडके.

 20,469 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.