सिद्धेश्वरी पागधरेला अर्धशतकाची हुलकावणी

विजयाचे लक्ष्य गाठण्याच्या प्रयत्नात सिद्धेश्वरीने ३८ चेंडत नऊ चौकार मारत संघाच्या विजयाचा पाया रचला.

ठाणे : अर्जुन मढवी स्मृती महिला टी ट्वेन्टी लीग क्रिकेट स्पर्धेतील आपल्या शेवटच्या साखळी लढतीत डहाणू पालघर तालुका स्पोर्ट्स असोसिएशनने दहिसर स्पोर्टस क्लबचा पाच विकेट्सनी पराभव करत पहिला विजय मिळवला. पण स्पर्धेत सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करणाऱ्या विजेत्या संघाच्या सिद्धेश्वरी पागधरेला मात्र या सामन्यात अर्धशतकाने हुलकावणी दिली. सिद्धेश्वरीच्या ३८ चेंडूतील ४६ धावांमुळे डहाणू पालघर तालुका स्पोर्टस असोसिएशन संघाने दहिसर स्पोर्टस क्लबचे २० षटकातील ९ बाद ९९ धावांचे आव्हान १६ व्या षटकात ५ बाद १०१ धावा करत पूर्ण केले.
डॉ राजेश मढवी स्पोर्टस असोसिएशन आणि दैवज्ञ स्पोर्टस क्लब आयोजित स्पर्धेतील या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या दहिसर स्पोर्टस क्लबला रचना पागधरे आणि संयुक्ता किणीच्या अचूक टप्प्यावरील गोलंदाजीने शतकी धावसंख्येच्या आत रोखले. रचना पागधरेने १७ धावांत ३ आणि आणि संयुक्ता किणीने २ षटकात १३ धावांत २ विकेट मिळवत आपली जबाबदारी चोख बजावली. अश्विनी निषाद आणि पौर्णिमा कोठारीने प्रत्येकी एक विकेट मिळवली. संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारुन देताना स्नेहल सिंगने ३० आणि प्रियांका गोलिपकरने २४ धावांचे योगदान दिले.
विजयाचे लक्ष्य गाठण्याच्या प्रयत्नात सिद्धेश्वरीने ३८ चेंडत नऊ चौकार मारत संघाच्या विजयाचा पाया रचला. ययाती गावंडने तीन चौकारानिशी १७ धावा केल्या. प्रियांका गोलिपकरने दोन तर वेदिका जोशी, सुप्रिया पवार आणि सौम्या सिंगने प्रत्येकी एक विकेट मिळवली. तडाखेबंद फलंदाजी करणाऱ्या सिद्धेश्वरीला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
संक्षिप्त धावफलक –
दहिसर स्पोर्टस क्लब : २० षटकात ९ बाद ९९ ( स्नेहल सिंग ३०, प्रियांका गोलिपकर २४, रचना पागधरे ४-१७-३, संयुक्ता किणी २-१३-२, अश्विनी निषाद ३-८-१, पौर्णिमा कोठारी २-८-१) पराभुत विरुद्ध डहाणू पालघर तालुका स्पोर्टस असोसिएशन : १६ षटकात ५ बाद १०१ ( सिद्धेश्वरी पागधरे ४६, ययाती गावंड १७, प्रियांका गोलिपकर २-१४-२, वेदिका जोशी २-१०-१, सुप्रिया पवार ३-१६-१, सौम्या सिंग ३ -१९-१). सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू : सिद्धेश्वरी पागधरे.

 7,775 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.