विकास घोडके पोलीस महासंचालकांच्या पुरस्काराने सन्मानित

पनवेल येथील ५० उच्चशिक्षित युवक दहशतवादी संघटनेत दाखल होणार असल्याची माहिती मिळताच विकास घोडके यांनी त्वरित कारवाई करत त्यांना तसे करण्यापासून रोखले व त्यांचे योग्य ते समुपदेशन करत समाजाच्या मूळ प्रवाहात आणले होते.

ठाणे : वागळे इस्टेट पोलिस स्टेशनच्या झोन पाचचे आणि ठाणे शहर पोलीस स्टेशनचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके यांना पोलिस दलातील उल्लेखनीय सेवे करता पोलिस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. ठाण्याचे सहपोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते किशोर घोडके यांना नुकतेच पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. देशाच्या संरक्षण दलातील सेवेचा वारसा विकास घोडके यांना घरातूनच मिळाला. त्याचे वडील शिवाजी घोडके हे माजी सैनिक आहेत. विज्ञान शाखेतील शेतकी विषयातील पदवीधर असलेल्या विकास घोडके यांनी १९९६ साली पोलीस उपनिरीक्षक म्हणून महाराष्ट्र पोलिस दलात प्रवेश केला. त्यांनतर विविध गुन्ह्यांचा कौशल्यपूर्ण तपास करून त्यांनी अनेक आरोपींना गजाआड केले. दहशतवाद विरोधी पथकात कार्यरत असताना इसिस या दहशतवादी संघटनेत दाखल झालेल्या एका युवकाला इराकमधून बोलावून अटक केली होती. याशिवाय पनवेल येथील ५० उच्चशिक्षित युवक दहशतवादी संघटनेत दाखल होणार असल्याची माहिती मिळताच विकास घोडके यांनी त्वरित कारवाई करत त्यांना तसे करण्यापासून रोखले व त्यांचे योग्य ते समुपदेशन करत समाजाच्या मूळ प्रवाहात आणले. गँगरेप मधील आरोपींना अवघ्या पाच ते सहा तासात त्यांनी अटक केली होती. दोन महिन्यांपूर्वी पहाटे गोळीबार आणि नंतर एक खून करून ठाणे शहरात खळबळ उडवणाऱ्या आरोपींनाही त्यांनी काही तासात शिताफीने अटक केली होती. मूळचे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील असणाऱ्या विकास घोडके यांना पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरीकरता आतापर्यंत दोनशेहून अधिक पुरस्कार मिळाले आहेत.

 4,111 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.